क्लस्टर शाळेमुळे इतर शाळा बंद होणार का?

आमदार संग्राम थोपटे म्हणाले, दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थी दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी क्लस्टर शाळा उभी करण्यात आली आहे. त्यास स्थानिकांचा किंवा लोकप्रतिनिधींचा विरोध नाही.

क्लस्टर  शाळेमुळे इतर शाळा बंद होणार का?
पानशेत येथे बांधण्यात आलेले क्लस्टर शाळेची इमारत

Panshet clustering school : पानशेत येथे उभारण्यात आलेल्या क्लस्टर शाळेमध्ये परिसरातील पटसंख्या कमी असलेल्या १३ शाळांमधील विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. परंतु, यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही.एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या घराजवळील शाळेतच शिक्षण घ्यायचे असेल तर ती शाळा सुरूच राहणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या घरापासून तीन किलोमीटर अंतरावर ही क्लस्टर शाळा नसल्यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या ( RTE) नियमावलीचा भंग होत आहे. त्यामुळे या नियमातून क्लस्टर शाळेला सूट द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. परंतु, अद्याप या प्रस्तावास मंजुरी मिळालेली नाही.

    शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी तीन किलोमीटर अंतराची अट आहे. ही अट शिथिल करावी अशी मागणी यापूर्वी पालकांनी केली आहे. मात्र अद्याप त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. क्लस्टर शाळेतील विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतराची सूट दिली तर इतरही शाळांकडून अशी सूट मागितली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे राज्य शासन क्लस्टर शाळेच्या प्रस्तावावर काय निर्णय घेणार ? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

राज्य शासनाने तीन किलोमीटर अंतराची सूट देण्याबाबतचा प्रस्ताव नाकारला तरीही क्लस्टर शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली जाणार आहे.  कारण क्लस्टर शाळेत सुमारे शंभर विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तसेच शाळेच्या परिसरातील ग्रामस्थ व मुलांच्या बालकांची जिल्हा प्रशासनाने चर्चा केली आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक आमदार किंवा इतर व्यक्तींचा या शाळेला विरोध नसल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी 'एज्युवार्ता' शी संवाद साधताना सांगितले.

स्थानिक आमदार संग्राम थोपटे म्हणाले, दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थी दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी क्लस्टर शाळा उभी करण्यात आली आहे. त्यास स्थानिकांचा किंवा लोकप्रतिनिधींचा विरोध नाही. विद्यार्थ्यांना संगणक, आत्याधुनिक ग्रंथालय, क्रीडांगण आदी सुविधा मिळत असतील आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असेल तर त्याला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही.

राज्यातील 'कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार' असा कांगावा गेल्या अनेक महिन्यांपासून केला जात आहे. क्लस्टर शाळेमुळे सुद्धा परिसरातील कमी पटसंख्येच्या शाळा सुद्धा बंद होतील, असा समज अनेकांनी करून घेतला आहे. परंतु, शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.