CBSE : वर्षातून दोनवेळा बोर्ड परीक्षा होणार नाहीत ? खरे काय आहे?

सीबीएसई बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून यामध्ये फेक न्यूजपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

CBSE : वर्षातून दोनवेळा बोर्ड परीक्षा होणार नाहीत ? खरे काय आहे?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बोर्डाच्या परीक्षा (exam) आता वर्षातून दोनवेळा घेतल्या जातील, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून (Union Ministry of Education) वारंवार सांगितले जात आहे. मात्र  ही परीक्षा जैसे थे म्हणजे वर्षातून एकदाच होणार ,अशा स्वरूपाची माहिती सोशल मिडियावर व्हायरल (Viral on social media) झाली होती. यावर आता सीबीएसई (CBSC Board) बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. 

सीबीएसई बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून यामध्ये फेक न्यूजपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये सीबीएसई बोर्डाने एका न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीचा हवाला दिला आहे. ही बातमी ३० जून रोजी प्रसिद्ध झाली होती. तिचा CBSE बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होऊ शकत नाहीत, असा मथळा होता. 

सीबीएसई बोर्डाने वरील बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे जाहीर केले आहे. सीबीएसई आणि शिक्षण मंत्रालयामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार नाहीत असा कोणताही संवाद झालेला नाही. 25 जून रोजी, CBSE ने नवीन शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत त्यांच्या भागधारकांसह एक बैठक घेतली. CBSE बोर्ड या सत्रापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची आणि वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा (CBSE बोर्ड परीक्षा 2025) आयोजित करण्याची तयारी करत आहे. 

दरम्यान, नवीन पॅटर्नची पहिली बोर्ड परीक्षा जानेवारी 2026 मध्ये आणि त्याच सत्राची दुसरी परीक्षा एप्रिल 2026 मध्ये होणार असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते.