'प्रियदर्शनी स्कूल'आयोजित 'संस्थापक दिन' समाजरत्न पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

प्रियदर्शनी स्कूलमधून विद्यार्थी उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहेत. तसेच आपले भवितव्य घडवत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना समाजाप्रती असणा-या बांधिलकीची जाणीव होणे गरजेचे आहे.त्याच उद्देशाने प्रियदर्शनी स्कूलतर्फे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

'प्रियदर्शनी स्कूल'आयोजित 'संस्थापक दिन' समाजरत्न पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न
Priyadarshini School Founder's Day


एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

"कर्म हेच धर्म " मानून आणि सामाजिक बांधिलकीतून शिक्षण सेवेत स्वतःला वाहून घेणा-या प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक कै. इंद्रमन सहदेव सिंह यांच्या स्मरणार्थ 'संस्थापक दिन' साजरा करण्यात आला. यानिमित्त  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना 'समाजरत्न' व 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सभागृहात शुक्रवारी हा सोहळा दिमाखात पार पडला.

हेही वाचा : शिक्षण प्रियदर्शनी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

प्रियदर्शनी स्कूलमधून विद्यार्थी उच्च दर्जाचे शिक्षण घेत असून  आपले भवितव्य घडवत आहेत.परंतु,विद्यार्थ्यांना समाजाप्रती असणा-या बांधिलकीची जाणीव होणे गरजेचे आहे.त्याच उद्देशाने प्रियदर्शनी स्कूलतर्फे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.हा कार्यक्रम शाळेतील विद्यार्थ्यांसमोर घेण्यात आला. सध्या केवळ व्यक्ती विशेष विचार केला जातो. मात्र, समाजाचे आपण काही देणे लागतो,याची शिकवण विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच मिळायला हवी. समाजाचा विकास झाला तरच आपला विकास होईल. हे विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहता आले.

अपार कष्टाने व खडतर जीवन प्रवास करून कै. इंद्रमन सहदेव सिंह यांनी पाच विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन सुरू केलेल्या प्रियदर्शनी शाळेचे आज मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे. शाळेच्या इंद्रायणी नगर, मोशी , चाकण, आळंदी अशा विविध शाखांमध्ये आता हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य अविरतपणे सुरू असून शाळेचे संस्थापक कै.इंद्रमन सिंह यांच्या स्मरणार्थ १४ जुलै २०२३ रोजी 'संस्थापक दिना'चे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने समाजरत्न व जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते अंकुश चौधरी उपस्थित होते. 


      प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल तर्फे बबन रामचंद्र बोराडे, प्रताप लालासाहेब मोहिते, दशरथ रघु बोराटे, कैलास बाजीराव दुधाळे, प्रभाकर दत्तात्रय कुऱ्हाडे, दिलीप ज्ञानदेव सावंत, दिनकर टेमकर, सुनील कु-हाडे, विनायक पाटील, संजय बबन गायके, ज्ञानेश्वर थोरवे यांना कै. 'कै. इंद्रमन सहदेव सिंह समाजरत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. तर विष्णुपंत फुगे व महादेव गव्हाणे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते अंकुश चौधरी, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक विलास माडीगेरी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रियदर्शनी स्कूलचे विश्वस्त डॉ. राजेंद्र सिंह, जितेंद्र सिंह, महेंद्र सिंह, सरिता सिंह, नरेंद्र सिंह आदी उपस्थित होते.

  अंकुश चौधरी म्हणाले, कलेच्या माध्यमातून मी लोकसेवा करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, आज विविध क्षेत्र मोठे योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराच्या निमित्ताने भेटता आले. त्यांच्या कार्यापुढे आपण काहीच नाही. याची जाणीव झाली. कै. इंद्रमन सिंह यांच्या जीवन प्रवासावर दाखविण्यात आलेला चरित्रपट पाहून मी भारावून गेलो. त्यांनी लावलेल्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. मलाही या सेवा कार्यात काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षाही अंकुश चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली.

कै. इंद्रमन सिंह यांनी अनेक गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत अजित गव्हाणे म्हणाले, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केले. त्यांच्यामुळे अनेक कुटुंबे उभी राहिली. त्यांची मुले वडिलांकडून मिळालेले समाज सेवेचे व्रत पुढे चालवत आहेत. या पुरस्कारामुळे इतरांना काम करण्याची प्रेरणा मिळेल.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र सिंह यांनी केले. ते म्हणाले, माझ्या वडिलांनी कामाला धर्म मानले. कर्म हेच धर्म मानून निष्ठेने काम केल्यास यश तुमच्या पायाशी येते, अशी शिकवण आम्हा भावंडांना त्यांच्याकडून मिळाली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात या कार्यक्रमाच्या माध्यमांतून समाजसेवेचे बीज अंकुरेल असा विश्वास वाटतो.

कार्यक्रमात कै. इंद्रमन सिंह यांच्या जीवन प्रवासावरील चरित्रपट दाखवण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, तरुणा सिंह, भरत लांडगे, निलेश मुटके, अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, तुषार शहाणे, अनुराधा गोफणे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश इनामदार यांनी केले. तसेच संस्थापक दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या शाळेत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रियदर्शनी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या (सीबीएसई) प्राचार्य डॉ. गायत्री जाधव व प्रियदर्शनी शाळा (एसएससी बोर्ड) प्राचार्य अर्पिता दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती व पारितोषिक वितरण समारंभाचे संयोजन केले.