नवीन मराठी शाळेच्या इमारतीची शंभरी

अनेक थोर कर्तृत्ववान मुख्याध्यापकांची व सुपरिटेंडेंट यांची परंपरा शाळेस लाभली. या प्रत्येकाच्या कालावधीत शाळेने त्या काळातील ' एक आदर्श प्राथमिक शाळा ' असा नावलौकीक मिळवला . डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ही शाळा यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना शाळेच्या मुख्य इमारतीस १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

नवीन मराठी शाळेच्या इमारतीची शंभरी

नवीन मराठी नवीन मराठी 
शाळा आमुची शिस्तीची 
शूरवीर होऊ आम्ही 
 सेवा करू या देशाची।

( Navin Marathi shala)  देशसेवेचे व्रत बालपणापासून रुजवण्यासाठी, राष्ट्रीय शिक्षणाचे मोठे ध्येय समोर ठेवून ते साध्य करण्यासाठी १२५ वर्षापूर्वी काही थोर विचारवंत एकत्रित आले. स्वातंत्र्य मिळाले तरी देश घडवण्यासाठी, सांभाळण्यासाठी स्वदेशाभिमानाचे बाळकडू देण्यासाठी लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, माधवराव नामजोशी, गोपाळ गणेश आगरकर या थोर समाजसुधारकांनी १८८० मध्ये पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कूल' ची (New English school ,Pune) स्थापना केली. मोरोबादादांचा वाडा,  गद्रे वाडा अशा ठिकाणी शाळा भरू लागली. अल्पावधीत  विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने व या शाळेस पूरक म्हणून  इ.१ ली ते ४ थी ची प्राथमिक शाळा स्वतंत्र असावी असे ठरले. ठरवल्याप्रमाणे  ४ जानेवारी १८९९ मध्ये 'नवीन मराठी शाळा' नावाने  होळकर वाड्यात शाळेचा नव्याने श्रीगणेशा झाला. 
      म.धोंडे केशव कर्वे हे शाळेला पहिले मुख्याध्यापक म्हणून लाभले. अनेक थोर कर्तृत्ववान मुख्याध्यापकांची व सुपरिटेंडेंट यांची परंपरा शाळेस लाभली. या प्रत्येकाच्या कालावधीत शाळेने त्या काळातील ' एक आदर्श प्राथमिक शाळा ' असा नावलौकीक मिळवला . डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ही शाळा यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना शाळेच्या मुख्य इमारतीस १०० वर्षे पूर्ण होत आहेत. असे दुहेरी ऐतिहासिक क्षण एकत्रित आले आहेत. 

           ब्रिटिश कालीन मोठी दगडी इमारत, इंग्रजांच्या बांधकाम शैलीची छाप पूर्णतः या इमारतीवर दिसून येते. ओतीव लोखंडी गोलाकार मोठे खांब, अर्धगोलाकार कमानी, मोठ्या लोखंडी तुळया, उतरते  कौलारू छप्पर, प्रशस्त आवार, प्रशस्त वर्ग, त्यात हवा उजेडासाठीचे झरोके, लाकडी व दगडी जिने,  रोझ विंडो मधील घड्याळ, मोठा प्रार्थना हॉल, शालेय बाग, वृक्षसंपदेने बहरलेला परिसर हे देखणेपण आजही शाळा टिकवून आहे.
     कब-बुलबुल उपक्रम स्वातंत्र्यपूर्व काळा पासून शाळेत आहे. शाडू मातीचे मातीकाम हे तर शाळेचे खास वैशिष्ट्य.  साच्यातील शाडूमातीचा छोटा गणपती मुले स्वतः बनवतात व रंगवतात. ही परंपरा १९३८ पासून  जोपासण्यात आली आहे . 'भातलावणी' चा उपक्रम मुले स्वतः चिखलणी करून अनुभवतात.
    आत्ताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मांडलेले कृतियुक्त शिक्षण आमच्या शाळेत स्थापनेपासून अंगीकृत
केलेले दिसते.
   १९४१ मध्ये बडोद्याचे संस्थानिक श्रीमंत सयाजीराव यांचे नावे मिळालेल्या देणगीतून वाचनालय उभे राहिले. प्राथमिक शाळेतील हे पहिलेच स्वतंत्र वाचनालय असावे. मातीकाम वर्ग, हस्ताक्षर वर्ग, डबे खाण्यास  स्वतंत्र शेड,  ड्रील हॉल,  विज्ञानवर्ग, संगणक कक्ष , गणित प्रयोगशाळा, संग्रहालय अशा स्वतंत्र वास्तू ,  मोठ्या हवेशीर वर्गखोल्या शाळेतील विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व बहुआयामी घडवण्यात मोलाचे ठरतात.
      पहिल्या स्वातंत्र्य दिनी लावलेला चाफ्याचा वृक्ष १९६१ च्या पानशेत धरण दुर्घटना या ऐतिहासिक घटनांसोबत  , लॉर्ड विलिंग्डन, जॉर्ज लॉईड , लेस्ली विल्सन( मुंबई प्रांत गव्हर्नर) , म. कर्वे , स्वा. सावरकर, तसेच सांगली, बडोदा येथील संस्थानिक समाजातील अशा अनेक थोर व्यक्तींनी शाळेस भेट देऊन कौतुक केलेले आढळते. भालबा केळकर, बाबासाहेब पुरंदरे, द. मा. मिरासदार, गिरीश कुलकर्णी (माजी विद्यार्थी) यांसह अनेक नामवंतांनी ही शाळेस भेट दिली आहे.

       महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात या शाळेचा फक्त नामोल्लेख होण्याइतके शाळेचे कार्य मर्यादित नाही . शाळेने विविध कलाकार, नामवंत तज्ञ डॉक्टर्स,  उद्योगपती , देश-विदेशात काम करणारे नावलौकीक मिळवलेले प्रथितयश अभियंते, खेळाडू घडवले आहेत. घडवत आहे.
       आजही राष्ट्रीय शिक्षण हा केंद्रबिंदू मानून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये  सामाजिक जाण निर्माण करणारे उपक्रम राबवले जातात. सन१९५२ पासून आतापर्यंत शाळेचे शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकलेले आहेत. सन २०१६ मध्ये १२५६ विद्यार्थ्यांसह ' गीतरामायण -   नृत्य नाट्य अविष्कार' याचा विश्वविक्रम बालचमूंनी  प्रस्थापित केला आहे. 
इंग्रजांचा काळ जाऊन इंग्रजी माध्यमाचा काळ आला असला तरी ' नवीन मराठी शाळा'  ही  पूर्णत: मराठी माध्यमाची शाळा शिक्षण, परंपरा, आधुनिकता जपण्यासाठी काळाप्रमाणे व नावाप्रमाणे नाविन्य घेवून सज्ज आहे.
    सरस्वतीच्या मंदिरातला हा ज्ञानाचा पोत अनेक महापुरुषांनी जेव्हापासून पेटवला , तेव्हापासून १२५ वर्षे पिढ्यानपिढ्यांनी तो सतत प्रज्वलित ठेवला आहे. या प्रकाशात अनेकजण घडले. अविरत सेवेची परंपरा राखण्यासाठी या ज्ञानज्योतीस आम्ही एकच मागणे मागतो.... 
घडो मायभूमीची अहर्निश सेवा 
मनाला अहंकार  कधी ना शिवावा 

नमो भास्करा दे अनोखा प्रकाश
तनाचा, मनाचा कराया विकास.

- प्रिया इंदुलकर,शिक्षिका ,नवीन मराठी शाळा, पुणे