NEET UG : 10 लाखांत परीक्षेत कॉपी करा; शिक्षण संस्थाचालकाला अटक

एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये घेऊन त्यांना परीक्षेत कॉपी करण्याची परवानगी देण्यात येत होती.

NEET UG : 10 लाखांत परीक्षेत कॉपी करा; शिक्षण संस्थाचालकाला अटक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NEET UG परीक्षेत घडलेल्या गैरप्रकार प्रकरणी CBI कडून देशाच्या विविध शहरांमध्ये कारवाई सुरू आहे. गोध्रा येथे झालेल्या कारवाई दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या ठिकाणच्या एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये घेऊन त्यांना परीक्षेत कॉपी (exam Copy) करण्याची परवानगी देण्यात येत होती. 

गुजरातमधील गोध्रा येथील जय जलाराम शाळेचा मालक दीक्षित पटेल याला NEET पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. यावेळी चौकशीत हा प्रकार उघड झाला. जय जलाराम शाळेत देखील परीक्षेचे केंद्र होते. या केंद्रातून परीक्षा देणार्‍या काही विद्यार्थ्यांकडून दीक्षित पटेल याने कॉपी करण्याची परवानगी देण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.  

यापूर्वी 27 जून रोजी सीबीआयने NEET-UG परीक्षेतील अनियमिततेप्रकरणी दीक्षित पटेल यांची चौकशी केली होती. सीबीआयने काही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले. या प्रकरणी जय जलाराम शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. NEET मध्ये झालेल्या अनियमिततेप्रकरणी गुजरातमधून पाच आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.