अभियांत्रिकी परीक्षा : पुन्हा परीक्षा घेणाऱ्या विद्यापीठाविरोधात NSUI चे आंदोलन

विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचे परिपत्रक जाहीर केले. मात्र या परिपत्रकास विद्यार्थ्यांनी विरोध केला. तसेच पुन्हा परीक्षा देण्यास विरोध दर्शविला.

अभियांत्रिकी परीक्षा : पुन्हा परीक्षा घेणाऱ्या विद्यापीठाविरोधात NSUI चे आंदोलन
NSUI Protest

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या   (Savitribai Phule Pune University) परीक्षा विभागातर्फे घेण्यात आलेल्या  द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विषयाच्या (software engineering- second year engineering student) परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील तब्बल ४० टक्के प्रश्न विचारले. त्यामुळे विद्यापीठाने पुन्हा परीक्षा घेण्याचे जाहीर केले. मात्र या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियातर्फे (NSUI) शनिवारी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Vc Dr.Suresh gosavi) यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची संवाद साधल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नुकतीच घेण्यात आली. परंतु, या परीक्षेत तब्बल ४० टक्के प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरील विचारण्यात आले होते.  त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचे परिपत्रक जाहीर केले. मात्र या परिपत्रकास विद्यार्थ्यांनी विरोध केला. तसेच पुन्हा परीक्षा देण्यास विरोध दर्शविला. विद्यापीठाच्या चुकीचा फटका आम्ही का सोसावा? असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना ग्रेस गुण द्यावे, अशी मागणी केली.

 
एकदा पेपर दिल्यानंतर पुढील काही दिवसात त्याच विषयाचा पेपर देण्याची आम्हा विद्यार्थ्यांची मानसिकता नाही. त्यामुळे विद्यापीठाने हा पेपर रद्द करावा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी कुलगुरूसमोर बोलून दाखवली. मात्र, परीक्षा न घेता गुण देणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षेला सामोरे जावे लागेल, अशी समजूत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी काढली.                                

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर झालेल्या आंदोलनात युवक काँग्रेस सरचिटणीस अक्षय जैन, युवक काँग्रेस सचिव आदिनाथ जावीर, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सरचिटणीस महेश कांबळे,छात्रभारती पुणे जिल्हा सदस्य अजय बनसोडे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.