अनेक शिक्षक सेवांतर्गत प्रशिक्षणाला मुकणार? शिक्षक महासंघाने मांडले गाऱ्हाणे

ऑनलाईन नाव नोंदणीची मुदत उन्हाळ्याच्या सुट्टीतच (Summer Vacation) संपवण्यात आली आहे. काही शिक्षकांना अद्याप ही नोंदणी करता आलेली नाही, करता येत नाही,

अनेक शिक्षक सेवांतर्गत प्रशिक्षणाला मुकणार? शिक्षक महासंघाने मांडले गाऱ्हाणे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क


शिक्षकांसाठीच्या (Teachers) वरिष्ठ व निवड श्रेणीसाठीच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाची (Teachers Training) ऑनलाईन नाव नोंदणीची मुदत उन्हाळ्याच्या सुट्टीतच (Summer Vacation) संपवण्यात आली आहे. काही शिक्षकांना अद्याप ही नोंदणी करता आलेली नाही, करता येत नाही, असा दावा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केला आहे. त्यामुळे अनेक शिक्षक प्रशिक्षणाला मुकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासाठी नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी महासंघातर्फे करण्यात आली आहे.

हेही वाचा : अखेर गणवेशावरून सरकार तोंडघशी; निर्णय बदलण्याची वेळ, शासन आदेश आला
महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे आणि समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (MSERTC) पत्र लिहिले आहे. प्रशिक्षणाचे परिपत्रक सुट्टी लागल्यानंतर निघाले तसेच नोंदणीचा कालावधी पूर्णपणे सुट्टीतच ठेवण्यात आला. महाराष्ट्रात असंख्य शिक्षक अध्यापनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते आपापल्या गावी गेलेले आहे. त्यापैकी कित्येकांचे गाव हे खेड्यापाड्यात असून तेथे अद्याप संपर्काची साधने, नेटवर्कचे जाळे व्यवस्थित झालेले नाही. त्यामुळे काही जणांना हे कळले नाही. आता सुट्टी संपण्याच्या कालावधीनंतर ते शाळेत हजर होण्यासाठी गावाहून परतणार आहेत, अशा अडचणी महासंघाने पत्रात मांडल्या आहेत. 

शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठीच्या नोंदणीची सोय उपलब्ध असावी, यासाठी दिनांक ३० जूनपर्यंत सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करण्याची लिंक उपलब्ध करून द्यावी. त्यादिवशी ११ / २३ वर्ष सेवा पूर्ण होत असलेल्या शिक्षकांना नावनोंदणीची संधी द्यावी, तसेच हे प्रशिक्षण निःशुल्क करावे, या मागण्या महासंघाकडून परिषदेकडे करण्यात आल्या आहेत.