Students Suicide : २०२१ मध्ये १८ वर्षांखालील १०  हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या

नैराश्यामुळे  विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण देशभरात वाढत आहे. यासंदर्भात आता भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांनी राज्यसभेत धक्कादायक माहिती दिली आहे.

Students Suicide : २०२१ मध्ये १८ वर्षांखालील १०  हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नैराश्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे (Students Suicide) प्रमाण देशभरात वाढत आहे. यासंदर्भात आता भाजप खासदार सुशील कुमार मोदी (MP Sushil Kumar Modi) यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) धक्कादायक माहिती दिली आहे. २०२१ मध्ये देशभरात १८ वर्षांखालील १० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तर  गेल्या पाच वर्षांत आयआयटी (IIT), आयआयएम (IIM) आणि एम्स (AIMS) सारख्या प्रमुख संस्थांमधील ७५ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे, अशी माहिती मोदी यांनी राज्यसभेत दिली.

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वसमावेशक यंत्रणा उभारावी, अशी विनंती मोदी यांनी केली आहे. नामांकित महाविद्यालये, विद्यापीठे, आणि मेडिकल, इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना होणाऱ्या गंभीर मानसिक आणि शारीरिक ताणतणामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे,  असे सांगून  मोदी यांनी पालकांच्या दबावाकडे लक्ष वेधले. 

IIM च्या संचालकांची नियुक्ती आणि त्यांना काढून टाकण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे

मोदी म्हणाले, "या आत्महत्या  मोठ्या संख्येने विद्यार्थी मानसिक आणि शारीरिक तणावातून जात असल्याचे प्रतिबिंबित करतात.  वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षांमधील तीव्र स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना गंभीर शैक्षणिक तणावाचा सामना करावा लागतो आणि मानसिक आरोग्याच्या  समस्या निर्माण होतात. कोचिंग सेंटर्समधील परीक्षेत कमी गुणांमुळे कमी आत्मसन्मान, पालकांच्या अपेक्षांचा दबाव, आर्थिक अडचणी आणि खराब कामगिरीबद्दलचा कलंक यासारख्या घटकांमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडते." 

२०२१ मध्ये १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या १० हजार ७३२ घटना घडल्या आहेत. २०२० च्या तुलनेत त्यात ४.५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत ७५ टक्के आयआयटी, आयआयएम, एम्स आणि इतर प्रमुख संस्थांमध्ये आत्महत्या करून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही प्रकरणे चिंताजनक दराने वाढत आहेत, अशी चिंता मोदी यांनी व्यक्त केली.

शैक्षणिक दबावाचे परिणाम अत्यंत चिंताजनक आहेत. आत्महत्या प्रतिबंधक यंत्रणा विकसित करावी आणि ती मिशन मोडमध्ये लागू करावी. सरकारने कोचिंग संस्था, शाळा आणि विद्यापीठांमध्ये मानसिक आरोग्य वाढविण्यासाठी सक्रिय पुढाकार घ्यावा, अशी विनंती मोदी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo