फाटक्या जीन्स घालणार नाही! कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर ही शपथ घ्या ...

कॉलेजमध्ये जाताना बहुतेक तरुण-तरूणी स्टायलिश कपडे घालून जातात. त्यामध्ये फाटलेली किंवी तशी स्टाईल असलेली जीन्सचा ट्रेंड आहे. त्यावर कॉलेजने आक्षेप घेतला आहे.

फाटक्या जीन्स घालणार नाही! कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर ही शपथ घ्या ...
College dressCode

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांनी अमुक एक ड्रेसकोड फॉलो करावा, असे फर्मान बऱ्याचवेळा कॉलेजकडून काढले जाते, किंवा विद्यार्थ्यांकडून देशसेवा, समाजसेवेची प्रतिज्ञा करून घेतली जाते. पण  कोलकात्याच्या आचार्य जगदीश चंद बोस कॉलेजने त्यांच्या विद्यार्थ्यांकडून अजब प्रतिज्ञापत्रावर सही  करण्याची सक्ती केली आहे. फाटक्या जीन्स घालणार नाही, अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना घ्यायला सांगण्यात आले आहे. कॉलेजच्या या अजब  निर्णयामुळे  सध्या हे कॉलेज चर्चेत आले आहे. 

कॉलेजमध्ये जाताना बहुतेक तरुण-तरूणी स्टायलिश कपडे घालून जातात. त्यामध्ये फाटलेली किंवी तशी स्टाईल असलेली जीन्सचा ट्रेंड आहे. त्यावर कॉलेजने आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांना फाटके किंवा आक्षेपार्ह कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. या संदर्भात कॉलेज व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञापत्र जारी केले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवव्या वर्षी दहावी अन् २१ व्या वर्षी पीएच.डी. झालेला तथागत चार वर्षांपासून बेरोजगार

कॉलेज व्यवस्थापनाने या प्रतिज्ञापत्रावर पालकांची स्वाक्षरी करणे बंधनकारक केले आहे.  या प्रतिज्ञापत्राचा मसुदाही कॉलेज व्यवस्थापनानेच तयार केला आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की, 'आम्ही शपथ घेतो की आम्ही फाटलेल्या किंवा अश्लील जीन्स घालून कॉलेज कॅम्पसमध्ये कधीही येणार नाही. आम्ही कॅम्पसमध्ये नेहमीच फॉर्मल ड्रेस घालू.' या प्रतिज्ञापत्रावर एका बाजूला विद्यार्थ्यांच्या आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या पालकांच्या स्वाक्षरीसाठी जागा देण्यात आली आहे.  

 या महाविद्यालयात ७ ऑगस्टपासून नवीन सत्र सुरू झाले आहे. या पार्श्ववभूमीवर  महाविद्यालय व्यवस्थापनाने येथे प्रवेश घेणाऱ्या सर्व नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी तसेच येथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काही नियम व कायदे जारी केले आहेत. मात्र, या प्रतिज्ञापत्रावरून गदारोळ सुरू झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला असून हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

याविषयी माध्यमांशी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य पूरण चंद्र मैती म्हणाले, "कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी अनेकदा फाटक्या जीन्स किंवा अयोग्य कपडे घातलेले दिसतात. त्यामुळे कॅम्पसचे वातावरण बिघडते. ही परिस्थिती लक्षात घेऊन नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला असा ड्रेस घालून कॉलेजमध्ये प्रवेश करता येणार नाही.  यानंतर जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. याचा उद्देश  कोणाच्याही स्वातंत्र्याला बाधा आणण्याचा  नाही, परंतु कॅम्पसमध्ये कोणालाही असभ्यतेची परवानगी दिली जाऊ शकत नाही. होय, जर कोणाला कॅम्पसच्या बाहेर असा ड्रेस घालायचा असेल तर त्यांना काही हरकत नाही."

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo