विद्यापीठात फॉरेस्ट ऑफिसरसाठी मास्टर्स प्रोग्राम

आपण सर्वजण २१ व्या शतकाच्या पूर्वार्धातील जगातील सर्वात तरुण पिढी आहात.आत्मनिर्भर भारताचे सार्वभौम व युवककेंद्री प्रारूप तुम्हीच साकारायला हवे, असेही कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.

विद्यापीठात फॉरेस्ट ऑफिसरसाठी मास्टर्स प्रोग्राम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (savitribai phule pune university)  १  हजार विद्यार्थी आणि १  हजार विद्यार्थीनी यांच्यासाठी सुसज्ज वसतिगृह (student hostel) तयार करणार, विद्यापीठात पदवीस्तरावर  विविध अभ्यासक्रम सुरू करणार तसेच केंद्रीय संशोधन अनुदान सहायता कक्ष ,दिव्यांग सहायता कक्ष व समान संधी केंद्राची स्थापना करण्याबरोबरच फॉरेस्ट ऑफिसरसाठी मास्टर्स प्रोग्राम (Masters Program for Forest Officer) सुरु करणार असल्याची घोषणा सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Suresh Gosavi vice chancellor of savitribai phule pune university) यांनी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुख्य इमारतींसमोरील प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणानंतर उपस्थित विध्यार्थ्यांना संबोधित करतांना कुलगुरु बोलत होते.यावेळी  विद्यापीठाचे कुलसचिव, व्यवस्थापन परिषद सदस्य,अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिष्ठाते, सर्व संविधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, सुरक्षा विभागाचे कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विध्यार्थी आणि विद्यापीठाच्या सर्व विभागातील विद्यार्थी  संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : SPPU NEWS: पीएच.डी. प्रवेशाच्या नियमावलीत बदल ; विद्यापीठाचे प्रवेश नोव्हेंबरमध्ये

गोसावी म्हणाले ,वर्तमान पिढी अधिक संवेदनशील आणि सर्जनशील आहे. इतिहासाचे आकलन करण्याची क्षमता आणि वर्तमानाचे सर्जनशील चित्र रेखाटण्याची कृतिप्रवणता हा या पिढीच्या सक्षमतेचा मानबिंदू आहे. आपण सर्वजण २१ व्या शतकाच्या पूर्वार्धातील जगातील सर्वात तरुण पिढी आहात.आत्मनिर्भर भारताचे सार्वभौम व युवककेंद्री प्रारूप तुम्हीच साकारायला हवे.

आपण सर्वजण स्वतंत्र व सार्वभौम भारताचे नागरिक आहोत. स्वातंत्र्यानंतरची पाचवी, सहावी आणि सातवी पिढी साधारणतः देशाच्या अमृतकाळात सहभागी झालेली आहे. या पिढीला भारताचा इतिहास मुद्दाम शिकण्याची गरज आहे. भूतकाळ आणि इतिहास यात मौलिक फरक आहे. अशा मौलिक इतिहासाशी आपण अधिक संवेदनशील असायला हवे, असेही गोसावी यांनी सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेही हे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने कुलगुरू यांनी उपस्थितांना अमृतमहोत्सवाच्या शुभेच्या देत यानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
--------------------

विद्यापीठात केंद्रीय खरेदी व निविदा कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.तसेच विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्रात स्थानिक गरजा लक्षात घेऊन स्कूल ऑफ मल्टिडीसिप्लनरी स्टडीज अंतर्गत नवनवीन उपक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. डेक्सल युनिव्हर्सिटी बरोबर एम एस सी इन बेसिक मेडिकल सायन्स आणि एम.एस. सी. इन बेसिक मेडिकल इंजनिअरिंग प्रोग्राम सप्टेंबरपासून लाँच करण्यात येणार असल्याचे सुरेश गोसावी यांनी यावेळी सांगितले.