SPPU NEWS: पीएच.डी. प्रवेशाच्या नियमावलीत बदल ; विद्यापीठाचे प्रवेश नोव्हेंबरमध्ये

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशाच्या नियमावलीत बदल केले जात आहेत.या पुढील काळात आता पीएचडी प्रवेशासाठी संवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.

SPPU NEWS: पीएच.डी. प्रवेशाच्या नियमावलीत बदल ; विद्यापीठाचे प्रवेश नोव्हेंबरमध्ये
Pune university

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (University Grant Commission) सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) पीएचडी प्रवेशाच्या नियमावलीत (PhD admission rule) बदल केले जात आहेत. लवकरच त्या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. तसेच विद्यापीठातर्फे येत्या नोव्हेंबर महिन्यात पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा (Pune University pet exam in November ) घेतली जाणार आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये तसेच विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रामध्ये पीएचडीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेतले जाते . तसेच संबंधित विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्यांना प्रवेश दिला जातो.  परंतु, या पुढील काळात आता पीएचडी प्रवेशासाठी संवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची पेट परीक्षेच्या ७०  टक्के गुण आणि मुलाखतीच्या ३० टक्के गुणांच्या आधारे संवर्धनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.पीएचडी प्रवेशाची नियमावली तयार करण्यासाठी विद्यापीठातर्फे डॉ. अविनाश कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

हेही वाचा : शिक्षण प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहार थांबविण्यात सीईटी सेल कडून कुचराई; युवासेनेचा आरोप

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दिवसेंदिवस खाजगी विद्यापीठांची संख्या वाढत चालली आहे.परंतु,या विद्यापीठांमध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तुलनेत कमीच आहे. विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रात अधिकाधिक मार्गदर्शक उपलब्ध करून देण्याचे काम विद्यापीठ प्रशासनातर्फे केले जात आहे.त्यामुळे पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक उपलब्ध होऊ लागले आहेत. परंतु,विद्यापीठांतर्गत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा दर्जा अधिक चांगला कसा होईल यावर विद्यापीठाने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएचडीचे शुल्क इतर विद्यापीठांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे केवळ पुण्यातीलच नाही तर पुढे बाहेरील विद्यार्थी सुद्धा विद्यापीठांतर्गत पीएचडी प्रवेश मोठ्या संख्येने अर्ज करतात.बदललेल्या नियमावलीनुसार पीएचडी प्रवेशासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात विद्यापीठाकडून अर्ज मागविले जातील तर नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाईल, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.