राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात पहिल्यांदाच सावरकर; सावित्रीबाई फुले यांचाही समावेश होणार

दिल्ली विद्यापीठाच्या शुक्रवारी विद्या परिषदेच्या जवळपास १५ तास चाललेल्या बैठकीत अनेक वादविवादातून या निर्णयांवर शिक्कामोर्तब केले आहे.

राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात पहिल्यांदाच सावरकर; सावित्रीबाई फुले यांचाही समावेश होणार
Veer savarkar, Savitribai Phule

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) कला शाखेच्या राज्यशास्त्र विषयाच्या पदवी अभ्यासक्रमात (BA Political Science) पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचाही तत्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत विचार सुरू असून त्यावरही लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या अभ्यासक्रमातून ‘सारे जहाँ से अच्छा’ हे देशभक्तीपर गीत लिहिणारे कवी इक्बाल (Poet Iqbal) यांना मात्र हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या शुक्रवारी विद्या परिषदेच्या जवळपास १५ तास चाललेल्या बैठकीत अनेक वादविवादातून या निर्णयांवर शिक्कामोर्तब केले आहे. बीए राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या नवीन अभ्यासक्रमातील बदलांवर बैठकीत चर्चा झाली. विद्यापीठाने पाचव्या सत्रासाठी सावरकर यांच्यावरील एक विभाग समाविष्ट केला आहे. तर या सत्रातील महात्मा गांधी यांचा भाग सातव्या सत्रात हलविण्यात आला आहे. सावरकरांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

एफसी, एसपी, बीएमसीसी,गरवारे, मॉडर्न कॉलेजचे प्रवेशाचे कधी होणार सुरू ? जाणून घ्या एका क्लिकवर

पूर्वी सावरकर यांचा अभ्यासक्रमात समावेश नव्हता. तर महात्मा गांधींना पाचव्या सेमिस्टरमध्ये शिकवले जात होते. आता पाचव्या सेमिस्टरमध्ये सावरकर, सहाव्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातव्यामध्ये गांधी यांचा समावेश केला आहे. कवी इक्बाल यांच्यावरील धडा बीए राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आला आहे.

इक्बाल यांच्यावरील भाग अभ्यासक्रमातून काढून टाकण्यावर मतभेद होते. विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंग यांनी ज्यांनी भारत तोडण्याचा पाया घातला ते अभ्यासक्रमाचा भाग होऊ शकत नाहीत, असे सांगत इक्बाल यांना अभ्यासक्रमातून काढून टाकण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. "इक्बाल यांनी मुस्लिम लीग आणि पाकिस्तान चळवळीला पाठिंबा देणारी गाणी लिहिली. भारताची फाळणी आणि पाकिस्तानच्या स्थापनेची कल्पना इकबाल यांनी सर्वप्रथम मांडली. अशा लोकांबद्दल शिकवण्याऐवजी आपण आपल्या राष्ट्रीय महापुरूषांचा अभ्यास केला पाहिजे," असे सिंग म्हणाले.

वैचारिक माओवादी शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत :देवेंद्र फडणवीस

सिंग यांनी सावित्रीबाई फुले यांचा बीए तत्वज्ञान अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत सुतोवाच केले आहे. त्यांनी याबाबत संबंधित विभागाला सुचना दिल्या असून त्यावर लवकरच निर्णय़ होण्याची शक्यता आहे. तत्त्वज्ञान विभागातर्फे देण्यात येणाऱ्या बीए अभ्यासक्रमांमध्ये डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान, महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान आणि स्वामी विवेकानंदांचे तत्त्वज्ञान तसेच सावित्रीबाई फुले यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo