हॅकरच्या दाव्यावर MPSC कडून मोठा खुलासा; विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहिती, प्रश्नपत्रिकेबाबत स्पष्टीकरण

विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहिती तसेच प्रश्नपत्रिकाही आपल्याकडे असल्याचा दावा हॅकरकडून केला जात होता. पण हा दावा आयोगाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे.

हॅकरच्या दाव्यावर MPSC कडून मोठा खुलासा;  विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहिती, प्रश्नपत्रिकेबाबत स्पष्टीकरण
MPSC Hall Ticket Leak

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशपत्र (Hall Ticket Hack) एका टेलिग्राम (Telegram) चॅनेलवर प्रसिध्द झाल्यानंतर खळबळ उडाली होती. तब्बल ९० हजारांहून अधिक प्रवेशपत्र या चॅनेलवर लिक करण्यात आल्याचा दावा केला जात होता. त्यासाठी हॅकरने (Hacker) आयोगाच्या मुख्य संकेतस्थळावरील बाह्यलिंकच्या वेबपेजच्या कोडमध्ये छेडछाड केल्याचे समोर आले आहे.

आयोगाकडून सोमवारी प्रवेशपत्राबाबत सविस्तर माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहिती तसेच प्रश्नपत्रिकाही आपल्याकडे असल्याचा दावा हॅकरकडून केला जात होता. पण हा दावा आयोगाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. आयोगाच्या दोन संकेतस्थळांपैकी https://mpsc.gov.in या मुख्य संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्दीपत्रके, निकाल, अभ्यासक्रम, इत्यादी PDF फाईलच्या स्वरुपातील माहिती प्रसिद्ध केली जाते. उमेदवारांचा कोणताही वैयक्तिक डेटा ठेवला जात नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : पोलीस भरतीत नियमांचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय!

ऑनलाईन अर्जप्रणाली करीता स्वतंत्र असलेल्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांचे प्रोफाइल, विविध जाहिरातींकरीता केलेले अर्ज, प्रवेशप्रमाणपत्रे, गुणपत्रक, इत्यादी वैयक्तिक तपशील उपलब्ध करून दिले जातात. दिनांक ३० एप्रिल रोजीच्या परीक्षेला ४ लाख ६६ हजार ४५५ उमेदवार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे केवळ आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे उपलब्ध करुन दिल्यावर प्रवेशप्रमाणपत्रे डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडते आणि त्यामुळे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळाचा सर्व्हर डाऊन होतो.

उमेदवारांना प्रवेशप्रमाणपत्र डाऊनलोड करताना सर्व्हर डाऊनचा अडथळा येऊ नये, याकरीता प्रवेशप्रमाणपत्रे डाऊनलोड करण्यासाठी आयोगाच्या मुख्य संकेतस्थळावर (https://mpsc.gov.in) एक वेगळी बाह्यलिक मागील काही वर्षापासून उपलब्ध करुन देण्यात येते. ज्यातून केवळ PDF स्वरुपातील प्रवेशप्रमाणपत्रेच डाऊनलोड करता येतात. आयोगाच्या मुख्य संकेतस्थळावरील (https://mpsc.gov.in) बाह्यलिकच्या वेबपेजच्या कोडमध्ये छेडछाड करुन काही उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्रामवरील एका चॅनेलने मिळविल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर आयोगाकडून प्रवेशप्रमाणपत्राची बाह्यलिक तातडीने बंद करण्यात आली. त्यानंतर टेलिग्राम चॅनेलवर प्रवेशप्रमाणपत्रे अपलोड होणे बंद झाले. आयोगाने लिंक बंद केल्यानंतर संबंधित चॅनेलने उमेदवारांचा इतर डेटा मिळविल्याचा दावा केला. त्यामध्ये एक दावा प्रश्नपत्रिका हॅक केल्याचा होता. वस्तुतः आयोगामार्फत आयोजित करण्यात येणान्या या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन नाहीत. त्यामुळे कोणत्याही पध्दतीने संबंधित चैनेलने त्या मिळविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यावरुन संबंधित चॅनेल अवास्तव व धादांत खोटे दावे करत असल्याचे प्रथमदर्शनीच जाणवत असल्याचे आयोगाने सांगितले.

हेही वाचा : ABVP ला तोडफोड भोवणार? राष्ट्रवादी, कृती समितीचा आक्रमक पवित्रा

दरम्यानच्या काळात आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आयोगाच्या वेगवेगळ्या सरवर होणाऱ्या हिट्सचा मागोवा घेऊन कोणीही अनधिकृत प्रवेश मिळविला नसल्याची खात्री केली. तसेच बाह्यलिंकवरुन अनधिकृतपणे प्रवेशप्रमाणपत्रे डाऊनलोड करणारा संशयित आयपी अँड्रेस मिळविला, ज्यावरुन संबंधित चॅनेलकडे केवळ लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या काही PDF स्वरुपातील प्रवेशप्रमाणपत्रा व्यतिरिक्त अन्य कोणताही डेटा नसल्याची खात्री झाली. तसेच आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या डाटा कोणतीही छेडछाड झाल्याचे दिसून आले नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

आयोगाकडून दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १.१० वाजता विषयांकित परीक्षेच्या प्रवेशप्रमाणपत्राबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकानंतर संबंधित टेलिग्राम चॅनेलने उमेदवारांचा वैयक्तिक तसेच प्रश्नपत्रिकेचा डाटा आपल्याकडे असल्याचा दावा करणारी पोस्ट पॅनेलवरून हटविली असल्याचे दिसून येते. दिनांक २३ एप्रिल रोजी यासंदर्भात सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याप्रकरणी सखोल तपास सुरु असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली.