पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय : गैरप्रकार टाळण्यासाठी पेन, पॅड परीक्षा केंद्रातच मिळणार, २३ जुलैला परीक्षा

परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅगा आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय : गैरप्रकार टाळण्यासाठी पेन, पॅड परीक्षा केंद्रातच मिळणार, २३ जुलैला परीक्षा
Police Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Police Recruitment : सशस्त्र पोलीस शिपाई भरती - २०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा दि. २३ जुलैला होणार असून त्यांना परीक्षा केंद्रातच (Examination Centre) काळा पेन आणि पॅड उपलब्ध करून दिले जाणार आहे. पोलीस भरतीसह विविध परीक्षांमध्ये गैरप्रकार समोर आले आहे. त्यासाठी पहिल्यांदाच अशी दक्षता घेण्यात आल्याचे समजते. 

मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम याठिकाणी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी  २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८  वाजेपर्यंत या परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

तलाठी भरती : ‘डबल’ फायद्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना गैरमार्गाचा वापर

लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटीने ई-मेलद्वारे पुरविलेले शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची कलर प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन कलर पासपोर्ट साईज छायाचित्र, तसेच या कार्यालयाकडून मैदानी चाचणी करीता पुरविण्यात आलेले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅगा आणू नयेत. जर उमेदवारांनी बॅगा आणल्यास त्या परीक्षा केंद्राच्या बाहेर स्वत:च्या जबाबदारीवर ठेवण्यात याव्यात. या बॅगा व त्यातील मौल्यवान व इतर वस्तू गहाळ किंवा चोरीस गेल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तलाठी भरतीत महाघोटाळा? SIT मार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, बड्या अधिकाऱ्यांवर आरोप

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे. ही लेखी परीक्षा नि:पक्षपातीपणे व पारदर्शकपणे घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये. तसेच ही बाब निदर्शनास आल्यास तत्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 चे समादेशक प्रणय अशोक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

दरम्यान, भरती परीक्षेसाठी पहिल्यांदाच पेन व पॅड पुरविले जाणार असल्याचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी सांगितले. मुंबईत पोलीस भरतीत गैरप्रकार आढळून आला आहे. तसेच इतर भरती परीक्षांमध्येही गैरप्रकार केले जात असल्याने अशी दक्षता घेतलेली असू शकतो. हा निर्णय स्वागतार्ह असल्याचेही कवठेकर यांनी सांगितले. इतर परीक्षांमध्ये अशी दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD