प्रत्येक शाळेत आता "आनंददायी शनिवार" शिक्षण विभागाचे आदेश

विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे, या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

प्रत्येक शाळेत आता "आनंददायी शनिवार"  शिक्षण विभागाचे आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची अभिरुची वाढीस लागावी,  विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी व्हावे, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे, या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी (For 1st to 8th grade students) "आनंददायी शनिवार" (Happy Saturday) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे,शिक्षण विभागातर्फे याबाबतचा अध्यादेश प्रसिध्द करण्यात आला आहे. 

विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार म्हणून  राबविण्यासाठी काही सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यात  प्राणायाम / योग / ध्यान- धारणा / श्वसनाची तंत्रे, आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण, दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना, रस्ते सुरक्षा, समस्या निराकरणाची तंत्रे, कृती, खेळ यावर आधारित उपक्रम, Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य, याशिवाय इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपुर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. 

विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रजनात्मक कल्पानाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही  विद्यार्थ्यांना ताण-तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती करण्याची गरज प्रकर्षाने जाणवते, या अनुषंघाने आनंददायी शनिवार उपक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.