पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्यातील काही शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

पंतप्रधान सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्यातील काही शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
PM Narendra Modi

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी (दि. १) पुणे (Pune) दौऱ्यावर येत आहेत. या कालावधीत वाहतूक पोलिसांकडून (Pune Traffic Police) विविध मार्गांवरील वाहतूकीत बदल केला आहे. तसेच कार्यक्रमस्थळांपासून काही अंतरावर असलेल्या शाळा (School) व महाविद्यालये (College) बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने काही शाळांनी स्वत:हून सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, काही संघटनांनी सर्वच शाळा व महाविद्यालयांना यादिवशी सुट्टी देण्याची मागणी केली आहे.    

पंतप्रधान सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. हा कार्य़क्रम स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान दुपारी १२.४५ शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

गुरुजीच घाबरले परीक्षेला; गुणवत्ता तपासण्याच्या परीक्षेला ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांची दांडी

पंतप्रधानांचा दौऱ्यामुळे वाहतूक पोलिसांकडून सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने विविध मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे मंगळवारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शहरातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्याची मागणी होत आहे.

त्याआधीच काही शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रम होणार असल्याने या महाविद्यालयासह परिसरातील शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर्व शाळांना सोमवार व मंगळवार अशी दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. टिळक रस्त्यावरील काही शाळा, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदीर परिसरातील शाळा, शिवाजीनगर येथील पोलीस मैदानाजवळील शाळा व महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली आहे. 

मध्यवर्ती भागासह बाणेर व इतर काही उपनगरांतील काही शाळांनीही सुट्टी जाहीर केली आहे. शहरांतून या शाळांमध्ये येणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही शाळांनी मंगळवारी ऑनलाईन वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही शाळा रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी मंगळवारचे अध्यापन पुर्ण करणार आहेत.

IIT Bombay : मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना कँटीनमध्ये बंदी, विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

याविषयी बोलताना विद्या प्रसारिणी सभेचे सचिव सतिश गवळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे आम्ही संस्थेच्या शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कुलसह आवारातील इतर शाळा तसेच दगडूशेठ गणपती मंदीर परिसरातील तीन शाळांना मंगळवारी सुट्टी दिली आहे. दौऱ्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, शहरातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी द्या, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जंयतीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयने ही मागणी केली. तसेच या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील पुणे दौरा असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही मागणी करण्यात आली आहे. या वेळी आरपीआयचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब जानराव, पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, हिमाली कांबळे, शाम सदाफुले, निलेश आल्हाट, विशाल शेवाळे आदीसह पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनचे मुख्य संघटक प्रशांत कनोजिया यांनीही तीन दिवसांपूर्वीच शिक्षण आयुक्तांना निवेदन देत शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली होती.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD