…मग त्यात गैर काय? वाबळेवाडी शाळेचे पुरावे दाखवत आमदार अशोक पवारांनी स्पष्ट केली भूमिका

माझ्याकडे २० हजार, २५ हजार, ३५ हजार रुपयांच्या अशा असंख्य पावत्या आहेत. शाळा सुधार निधीच्या नावाखाली हा निधी गोळा केला जात होता, असा आरोप आमदार पवार यांनी केला.

…मग त्यात गैर काय? वाबळेवाडी शाळेचे पुरावे दाखवत आमदार अशोक पवारांनी स्पष्ट केली भूमिका
MLA Ashok Pawar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विधानसभेत पुणे (Pune) जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील (Wablewadi ZP School) गैरप्रकाराची कालबध्द चौकशी करण्याची मागणी आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांनी केली होती. त्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी त्यांना थेट गावबंदी केली. त्यानंतर पवार यांनी सोमवारी शाळेतील गैरप्रकाराचे काही पुरावे असल्याचा दावा करत भूमिका स्पष्ट केली. एखाद्या शाळेमध्ये जर मोठ्या रकमेचे डोनेशन घेऊन प्रवेश (Donation for Admission) दिले जात असेल तर अशा शाळेविरोधात मी आवाज उठवला तर त्यात काय गैर आहे, असे पवार म्हणाले.

अशोक पवार यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, एक पालक माझ्याकडे आले होते. दोन वर्ष त्यांना वाबळेवाडीच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही. त्यांनी मला २५ हजार रुपयांची एक पावती दाखविली. तेवढे पैसे दिल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. माझ्याकडे २० हजार, २५ हजार, ३५ हजार रुपयांच्या अशा असंख्य पावत्या आहेत. शाळा सुधार निधीच्या नावाखाली हा निधी गोळा केला जात आहे. तो निधी कोणत्यातरी दोन इसमांच्या वैयक्तिक खात्यांवर टाकला गेला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्यातील काही शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

जिल्हा परिषदेच्या इतर शाळांनाही अशा परवानग्या द्याव्यात. आम्हीही जिल्हा परिषदेच्या शाळात शिकलो. एक रुपयाही खर्च आला नाही. असे पैसे घेतले जात असतील तर गोरगरीबांच्या मुलांना शाळेत मिळेल का. याची जिल्हा परिषदेने चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा माझ्याकडे अहवाल आहे. त्यात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहोत. दोन वर्ष का काहीच झाले नाही. म्हणून याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत पवार यांनी पावत्या व चौकशी अहवाल दाखवला.

याबाबत पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या वाबळेवाडी शाळेत झालेल्या कथित गैरप्रकाराबद्दल मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. काहींनी त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला हे खेदजनक आहे. वाबळेवाडी शाळेतील काही खोल्यांना माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. स्व.अटलजी हे देशाचे पंतप्रधान म्हणूनच नव्हे तर एक आदर्श राजकारणी, अभ्यासू, बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून तुम्हा-आम्हा सर्वांना वंदनीय आहेत. त्यांचे नाव माझ्या मतदारसंघातील शाळेला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. कधीकाळी मी विधानसभेत वाबळेवाडी शाळेचे कौतुक देखील केले आहे.

वाबळेवाडी शाळा प्रकरण : आमदार अशोक पवार यांना गावबंदी, गावकऱ्यांनी घेतला निर्णय

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुले शिकत असतात आणि अशा एखाद्या शाळेमध्ये जर मोठ्या रकमेचे डोनेशन घेऊन ॲडमिशन दिले जात असेल तर अशा शाळेविरोधात मी आवाज उठवला तर त्यात काय गैर आहे? संबंधित शाळेतील कथित गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल आणि मिळालेले पुरावे यांच्या आधारे मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. मी आतापर्यंत सर्वसामान्य जनता केंद्रीभूत ठेऊनच समाजकारण, राजकारण केले आहे आणि भविष्यात देखील तशीच माझी वाटचाल राहणार आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD