संघटना स्थापन केली म्हणून कर्मचारी निलंबित; ‘एमआयटी’तील प्रकार

पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये प्रशासन आणि कर्मचारी आमनेसामने उभे ठाकले आहेत.

संघटना स्थापन केली म्हणून कर्मचारी निलंबित; ‘एमआयटी’तील प्रकार
MIT World Peace University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील (Pune) कोथरुड (Kothrud) येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये (MIT World Peace university) प्रशासन आणि कर्मचारी आमनेसामने उभे ठाकले आहेत. कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत संघटना स्थापन केल्यामुळे ही कारवाई केल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामध्ये एका कर्मचाऱ्याला बडतर्फ तर सहा जणांना निलंबित करण्यात आले असून अन्य काही कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती कर्मचारी संघटनेकडून (Workers Union) देण्यात आली.

पुणे जिल्हा पुणे विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटनेची शाखा एमआयटी महाविद्यालयात स्थापन करण्यात आली आहे. दोन मे रोजी या संघटनेचा फलक महाविद्यालयात बसविण्यात आला. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजा म्हाळुंगे (Raja Mhalunge) व सचिव सुनिल वडवेराव (Sunil Wadverao) यांनी दिली.

मुलींची अंतर्वस्त्र तपासली; ‘नीट’दरम्यान धक्कादायक प्रकार, रुपाली चाकणकरांकडून चौकशीचे आदेश

वडवेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन-चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळालेली नाही. तसेच जुन्या कर्मचाऱ्यांना नव्याने करार पध्दतीने रुजू करून घेतले जात आहे. त्याला कर्मचाऱ्यांना जोरदार विरोध केला. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी सर्व जणांनी एकत्रित येत संघटना स्थापन करून दोन तारखेला त्याचा फलक बसविला. त्याचाच राग आल्याने प्रशासनाने निलंबनाची कारवाई सुरू केली आहे.

प्रशासनाने ४८ कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असून आतापर्यंत दहा जणांना निलंबित केले आहे. तसेच एकाला बडतर्फ केले असून काही जणांना नोटीस बजावल्या आहेत. प्रशासनासोबत आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. तसेच पत्रही दिल्याचा दावा वडवेराव यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

गिरीष महाजनांसोबत रणजितसिंह देओल, सुहास दिवसे निघाले जर्मनी अन् स्वित्झर्लंडला

राजा म्हाळुंगे यांनी सांगितले की, संघटनेचा फलक बसविण्यावेळी संस्थेविरोधात घोषमाबाजी केल्याच्या कारणास्तव निलंबन केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पण आम्ही तशी एकही घोषणा दिलेली नाही. तसे असेल तर प्रशासनाने पुरावा द्यायला हवा. आम्ही काहीही चुकीचे बोललेलो नाही. तरीही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही म्हाळुंगे यांनी केला. दरम्यान, याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव गणेश पोकळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

"एमआयटी संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी बाहेरील संघटनेला बरोबर घेऊन विद्यापीठातील अधिकारी व प्राध्यापकांवर दबाव आणल्याने संस्थेचे वातावरण खराब झाले. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर विद्यापीठाच्या नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. या कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक न्याय हिरावून घेतलेला नाही. त्यांना याबाबत नोटीस बजावण्यात आली असून चौकशी समिती समोर त्यांना म्हणणे मांडता येणार आहे. समितीच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे कुलसचिवांकडे किंवा कुलगुरूंकडे आपले म्हणणे गरजेचे होते. तसे न करता त्यांनी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणला. त्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही केली जात आहे.

- डॉ.गणेश पोकळे, कुलसचिव, एमआयटी विद्यापीठ,

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2