शाळांच्या परवानगीसाठी २५ कोटींची ऑफर! केसरकरांचा गौप्यस्फोट, कोण आहेत ते एंजट?

राज्यातील अनेक शाळांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून मान्यता मिळवल्या असून त्या राजरोसपणे सुरू आहेत. काही शाळांनी तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

शाळांच्या परवानगीसाठी २५ कोटींची ऑफर! केसरकरांचा गौप्यस्फोट, कोण आहेत ते एंजट?
School Education Minister Deepak Kesarkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शालेय शिक्षण विभागातील (School Education Department) भ्रष्टाचाराचा (Corruption) मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता खुद्द मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विभागातील एजंटगिरीबाबत गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. मंत्री झाल्यानंतर आपल्याला शाळांना परवानगीसाठी वर्षाला २५ कोटींची ऑफर देण्यात आल्याचे वक्तव्य केसकर यांनी केले आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचार तसेच एजंटांच्या सुळसुळाटाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 

राज्यातील अनेक शाळांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून मान्यता मिळवल्या असून त्या राजरोसपणे सुरू आहेत. काही शाळांनी तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार आशिष शेलार यांनी मान्यतेवेळी, पडताळणीदरम्यान जर बोगस कागदपत्रे तपासली जात नसतील तर ती मिलीभगत आहे का? हे काम कोणी तरी ठरवून करतंय, गॅंग काम करतेय, असा आरोप केला होता.

SSC, HSC Exam : फॉर्म नं. 17 अजून भरला नाही? बोर्डाने दिली शेवटची संधी

 

शाळांना मान्यता तसेच शिक्षण विभागातील इतर कामेही एजंटांशिवाय होत नसल्याचा आरोप विविध संघटनांकडूनही सातत्याने केला जातो. केसकर यांनी गुरूवारी केलेल्या गौप्यस्फोटाने त्याला एकप्रकारे बळच मिळाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्रालयात एजंटांचा सुळसुळात झाल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना केसरकर यांनी गुरूवारी हा गौप्यस्फोट केला आहे.

 

माध्यमांशी बोलताना केसकर म्हणाले, शालेय शिक्षण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही एजंट आले होते. त्यांनी वर्षाला २५ कोटी रुपये देतो. आम्ही आणलेल्या शाळांना परवानगी द्या, अशी ऑफर दिली होती. पण, मी असे केले नाही. परवानग्या देताना मी सह्या करतो आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते फाईल आणि गुलाबाचे फुल देतो. कोट्यावधी रुपये कुणाला नको असतात असे नाही. पण आमची काम करण्याची अशी पद्धत नाही. जनतेसाठी आम्ही काम करतो.

 

अॅडमिशनसाठीही तशी ऑफर आली होती. महाराष्ट्राच्या राजधानीत आम्ही करतो. मुंबई ही मायानगरी आहे. मुंबई ही भारताची कमर्शियल कॅपिटल आहे. त्यामुळे अशा ऑफर येत राहणार. ते आमच्याशी संबंधित असतात, असे समजू नका, असेही केसरकर यांनी सांगितले. दरम्यान, केसरकर यांच्या दाव्यानंतर आता शिक्षण विभागात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हे एजंट नेमके कोण, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j