मुलींची अंतर्वस्त्र तपासली; ‘नीट’दरम्यान धक्कादायक प्रकार, रुपाली चाकणकरांकडून चौकशीचे आदेश

महाराष्ट्रात सांगली येथील एका परीक्षा केंद्रावरही असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुलींची अंतर्वस्त्र तपासली; ‘नीट’दरम्यान धक्कादायक प्रकार, रुपाली चाकणकरांकडून चौकशीचे आदेश
NEET UG 2023 Examination Centre Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून (NTA) रविवारी देशभरात घेण्यात आलेल्या नीट (NEET 2023) परिक्षेदरम्यान परीक्षार्थी विद्यार्थ्यांनींची अंतर्वस्त्रही तपासल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. देशभरातून याबाबत आता तक्रारी येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) सांगली (sangali) येथील एका परीक्षा केंद्रावरही असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने (Maharashtra State commission for Women) गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकाचवेळी नीट परीक्षा घेण्यात आली. अनेक परीक्षा केंद्रांवर मुलींची अंतर्वस्त्र तपासण्यात आली. मुलींची कपडे काढून त्यांना उलटी घालण्यास सांगितले गेले. याचा अनेक मुलींना धक्का बसला आहे. सांगलीतील या प्रकाराची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेत एनटीएला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

MSBSVET : कौशल्य, व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

याविषयी माहिती देताना चाकणकर म्हणाल्या, देशभरात एकाच वेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी केल्याच्या घटना देशभरात घडल्याचे माध्यमांनी समोर आणले आहे. आपल्या राज्याबाबत बोलायचे झाल्यास, सांगलीमध्ये विद्यार्थिनीला कपडे उलटे घालायला लावणे, अंतर्वस्त्र तपासणे अशा तक्रारी आल्या आहेत. तक्रार दाखल झाल्याने सांगली मधील प्रकार समोर आला आहे. मात्र ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात अनेक केंद्रांवर घेतली गेली.

अनेक केंद्रांवर काय झाले आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये, म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल, अशी तपासणी अतिशय चुकीची आहे. अशी तपासणी करण्याच्या सूचना कोणी दिल्या? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे चाकणकर यांनी स्पष्ट केले.

याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरातील प्रकाराची चौकशी करणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून,राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडूनही खुलासा मागविण्यात आला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2