UGC Net, ग्रामसेवक भरती परीक्षा एकाच दिवशी; तारीख बदलण्याची मागणी

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी युजीसी नेट आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेद्वारे कंत्राटी ग्रामसेवक पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवार चिंतेत असून त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

UGC Net, ग्रामसेवक भरती परीक्षा एकाच दिवशी;  तारीख बदलण्याची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या पात्रतेसाठी  (Eligibility of Assistant Professor posts and Ph. D. for admission Exam) घेतली जाणारी युजीसी नेट (UGC Net) आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेद्वारे कंत्राटी ग्रामसेवक पदांसाठी (Contract Gram Sevak Post) घेण्यात येणारी  परीक्षा एकाच दिवशी आली आहे.त्यामुळे या दोन्ही परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या दोन्ही परीक्षांंचे वेळापत्रक जाहीर झाले असून दोन्ही परीक्षा (Two exams in one day) १८ जून रोजी घेण्यात येणार आहेत. युजीसी नेट आणि ग्रामसेवक परीक्षांसाठी अर्ज केलेले उमेदवार आता तक्रारांचा पाढा वाचताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या या समस्यांना प्रशासन किती गांभीर्याने घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांच्या पात्रतेसाठी येत्या १८ जून रोजी नेट परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच. डी. पदवीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. नेट परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार असून सकाळी ९.३० ते १२.३० या पहिल्या सत्रात, तर ३ ते ६ वाजता दुपारच्या दुसऱ्या सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्याने गेली काही महिने अडकलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त मिळाला. त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांची लेखी परीक्षा १० जूननंतर होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील कोकण पदवीधर विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. मात्र, निवडणुक आयोगाने परवानगी दिल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून सरळसेवा पदभरती अंतर्गत जून महिन्यात  ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक (महिला) व कंत्राटी ग्रामसेवक पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. वेळापत्रकानुसार १६, १८, १९, २० आणि २१ जुन दरम्यान दोन सत्रात घेतली जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरी ग्रामसेवक पदाच्या परीक्षेची तारीख बदलावी,असही मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.