लोकसभा निवडणुकांमुळे सेट परीक्षेत बदल होणार का ? केव्हा मिळणार हॉल तिकीट

यंदा सेट परीक्षेसाठी 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून परीक्षेचे हॉल तिकीट येत्या 28 मार्चपासून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकांमुळे सेट परीक्षेत बदल होणार का ? केव्हा मिळणार हॉल तिकीट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असली तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University)घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेच्या (set exam)तारखेत कोणताही बदल होणार नाही.येत्या 7 एप्रिल रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यातील (States of Maharashtra and Goa)प्रमुख 17 शहरांमधील 298 परीक्षा केंद्रांवर (exam centers) सेट परीक्षा घेण्यात येणार आहे.यंदा सेट परीक्षेसाठी 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून परीक्षेचे हॉल तिकीट येत्या 28 मार्चपासून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सेट परीक्षा घेतली जाते. येत्या 7 एप्रिल रोजी होणारी सेट परीक्षा ही 39 वी परीक्षा आहे. पुढील काळात घेतlली  जाणारे 40 वी सेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यामुळे 7 एप्रिल रोजीची सेट परीक्षा ही शेवटची ऑफलाईन परीक्षा ठरणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख 16 शहरांमध्ये व गोव्यातील पणजी शहरात सेट परीक्षेची केंद्रे आहेत.

हेही वाचा : विद्यापीठाशी संलग्न तब्बल 125 महाविद्यालयांना लागणार टाळे?

सेट परीक्षेच्या तारखेपूर्वी साधारणपणे दहा दिवस आधी परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. त्यानुसार येत्या 28 तारखेला सेट विभागाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करून घेता येणार आहे. तसेच  सकाळी 10 ते 11 या वेळेत सेट परीक्षेचा पहिला पेपर तर 11.30 ते 1.30  या वेळेत दुसरा पेपर होणार आहे. या दोन्ही पेपर मध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणताही खंड नसेल. विद्यार्थ्यांना एक सलग 10 ते 1.30 या वेळेत पेपर द्यावा लागेल. दोन पेपर मधील अर्धा तास हा प्रशासकीय कामकाजासाठी उपलब्ध आहे,असेही विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या 7 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणारी सेट परीक्षा महाराष्ट्र व गोवा राज्यातील 17 शहरांमध्ये 298 परीक्षा केंद्रांवर होईल.विद्यार्थ्यांना  परीक्षेचे हॉल तिकीट येत्या 28 मार्चपासून उपलब्ध करून दिले जाणार आहे. या परीक्षेसाठी 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
 - डॉ. विजय खरे, प्रभारी , कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे