पीएचडी प्रवेशाचे अर्ज पुढील आठवड्यात स्वीकारणार; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

विद्यापीठातर्फे येत्या मंगळवारी किंवा बुधवारी या संदर्भातील अधिकृत घोषणा केली जाईल,त्यानंतर पीएच.डी. प्रवेशाबाबतचे चित्र स्पष्ट होईल. 

पीएचडी प्रवेशाचे अर्ज पुढील आठवड्यात स्वीकारणार; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) विविध विभागांमधील व संलग्न संशोधन केंद्रातील(Research Centers)पीएचडी प्रवेशासाठी (PHD admission)पुढील आठवड्यापासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे पीएच.डी. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची उत्सुकता लवकरच संपुष्टात येणार आहे. विद्यार्थ्यांना सुमारे महिनाभर अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार असून जुलै महिना अखेरीस अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश पूर्व परीक्षा (पेट)घेण्याचे नियोजन आहे. मात्र, विद्यापीठातर्फे येत्या मंगळवारी किंवा बुधवारी या संदर्भातील अधिकृत घोषणा (Official announcement)केली जाईल,त्यानंतर पीएच.डी. प्रवेशाबाबतचे चित्र स्पष्ट होईल,असे विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील संशोधन केंद्रातील पीएच.डी. प्रवेशाच्या रिक्त जागांची माहिती जमा करण्यात आली आहे. 10 जूनपर्यंत रिक्त जागांची माहिती जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती.त्यामुळे आता रिक्त जागांनुसार पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज मागवले जाणार आहेत. यंदा पीएच.डी. प्रवेशाच्या जागा कमी होणार आहेत.त्यामुळे प्रवेशाचे मेरिट वाढण्याची शक्यता आहे. त्यातच यंदा प्रथमच युजीसी नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमध्ये पीएच.डी.साठी प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे केवळ विद्यापीठाची पेट परीक्षा दिलेले विद्यार्थीच नाही तर नेट परीक्षा दिलेले विद्यार्थी सुध्दा प्रवेशास पात्र असणार आहेत. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे येत्या 18 जून रोजी युजीसी नेट परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशासाठी पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. परंतु, विद्यापीठातर्फे जुलै महिन्यात पीएच.डी.पेट होणार असल्याने ज्यांना नेट परीक्षा देणे शक्य झाले नाही,असे विद्यार्थी पेट परीक्षा देऊ शकतील.पेट परीक्षेला विलंब झाला असला तरी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे,असे बोलले जात आहे.