हृदयद्रावक : स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या धक्क्याने ‘ब्रेन डेड’! महिनाभरापासून तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू

पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत तिने उपजिल्हाधिकारी पदासाठी मुलाखतही दिली. पण तिची निवड झाली नाही. पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही पहिल्याच प्रयत्नात ती मुलाखतीपर्यंत पोहचली. इथेही तिच्या पदरी निराशा पडली. पण तरीही ती खचून गेली नाही.

हृदयद्रावक : स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या धक्क्याने ‘ब्रेन डेड’! महिनाभरापासून तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू
Competitive Examination Pressure

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

स्पर्धा परीक्षेत (Competitive Examination) येणाऱ्या सततच्या अपयशामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली असलेली तरुणी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केल्यामुळे कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसलाय. अपयश पचवता न येणे, प्लॅन बी (Plan B) तयार नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपले आयुष्य सावरणे कठीण जात आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही भरडले जात असल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

सायली काळे (नाव बदलले आहे) ही तरुणी स्पर्धा परीक्षेतील अपयशाने पुरती खचून गेली होती. या ताणातून तिचा रक्तदाब वाढला अन् पुढे गुंतागुंत अधिकच वाढत गेली.  पुण्यातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मेंदू मृत झाल्याचे (ब्रेन डेड) स्पष्टपणे सांगून हात वर केले आहेत. मागील महिनाभरापासून रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

महाराष्ट्रातील ७१ जण होणार IAS, IPS; रँकसह त्यांची नावे इथे वाचा

सायली ही २७ वर्षांची असून मुळची इंदापूर तालुक्यात एका खेडेगावात राहणारी. अभ्यासासाठी सहा वर्षांपुर्वी पुण्यात आली होती. पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत तिने उपजिल्हाधिकारी पदासाठी मुलाखतही दिली. पण तिची निवड झाली नाही. पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही पहिल्याच प्रयत्नात ती मुलाखतीपर्यंत पोहचली. इथेही तिच्या पदरी निराशा पडली. पण तरीही ती खचून गेली नाही.

घरच्यांकडून तिला प्रोत्साहन मिळत होते. कोरोना काळात सायलीला गावाकडे जावे लागले. तेव्हापासून ती घरूनच परीक्षेची तयारी करत होती. काही परीक्षाही दिल्या. पण त्यामध्येही यश मिळाले नाही. तेव्हापासून ती मानसिकदृष्ट्या खचत गेली. दोन महिन्यांपुर्वी तिच्याच गावातील दोन तरुण एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. हे पाहून ती निराशेच्या गर्तेत ओढली जाऊ लागली.

UPSC Result : रुग्णसेवा करतानाच नागरी सेवेचे स्वप्न साकारले! राज्यात पहिली आलेली कश्मिरा आहे डॉक्टर

महिनाभरापूर्वी तिचा रक्तदाब अचानक वाढला. त्यामुळे गावातील डॉक्टरांकडे गेली. त्यांनी काही औषधे दिली. पण घरी आल्यानंतर मानसिक ताणातून तिने एकाचवेळी तीन-चार गोळ्या खाल्या आणि तिचा रक्तदाब खूप कमी झाला. त्यामुळे तिचे हृदय काही काळ बंद पडले. परिणामी, मेंदूला रक्तपुरवठा न झाल्याने कार्य बंद पडल्याची माहिती सायलीच्या कुटुंबियांनी दिली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मेंदू मृत झाल्याचे जाहीर केले. मागील महिनाभरापासून ती पुण्यात खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या केवळ डोळ्यांची हालचाल होते. डॉक्टरांनी आशा सोडली असली तरी सायलीला पुन्हा तिच्या पायावर उभे करण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न सुरूच आहेत.

वर्षभरापूर्वी IPS, पण IAS व्हायचं स्वप्न शांत बसू देईना! सलग दुसऱ्यांदा केली यूपीएससी क्रॅक

प्लॅन बी काहीच नाही

सायलीकडे फार्मसीची पदवी आहे. पण व्यवसाय करण्यासाठी आवश्यक परवानाच घेतलेला नव्हता. हा परवाना चार महिन्यांपुर्वीच घेण्यात आला. तिने खासगी कंपनीत नोकरीसाठीही प्रयत्न केले. मात्र, या कंपन्यांमध्ये आरोग्यविषयक कारणांमुळे महिलांना प्रयोगशाळेत नोकरी देणे बंद केले. त्यामुळे सायली तिथेही अपयशी ठरली. स्पर्धा परीक्षेतील अपयश, नोकरी किंवा व्यवसाय करणेही शक्य नसल्याने तिने याचे खूप दडपण घेतल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. सायलीने आधीच प्लॅन बी ची तयारी केली असती तर कदाचित आज वेगळे चित्र असते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2