बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशीप परीक्षेत गोंधळ; परीक्षा रद्द करण्याची मागणी

या परीक्षेत 2019 च्या सेट परीक्षेचे प्रश्न विचारले गेले.

बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशीप परीक्षेत गोंधळ; परीक्षा रद्द करण्याची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बार्टी, सारथी आणि महाज्योती (Barti ,sarthi and Mahajyoti) या शासकीय संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत (fellowship exam) गोंधळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे  (Savitribai Phule Pune University) 2019 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेतील प्रश्न (Set Exam Questions) जसेच्या तसे या परीक्षेसाठी विचारण्यात आले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचे पाकीट परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांच्या समोर उघडले गेले नाही, असाही आक्षेप विद्यार्थी नोंदवत आहेत.

 पीएचडी धारक विद्यार्थ्यांना बार्टी, सारथी ,महाज्योती या संस्थांकडून सरसकट फेलोशिप द्यावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून विविध विद्यार्थ्यांनी संघटनांकडून केली जात आहे. मात्र शासनाने फेलोशिपसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे परीक्षेची जबाबदारी देण्यात आली.परंतु, या परीक्षेसाठी 2019 चा सेट परीक्षेचा पेपर वापरला गेल्या असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.

हेही वाचा : शिक्षण युजीसीकडून भारतीय बौद्ध धर्माचा इतिहास, बौद्ध पर्यटन, बौद्ध तत्त्वज्ञानावरील अभ्यासक्रम शिकण्याची संधी

सारथीच्या पीएचडी धारकांना सरसकट फेलोशिप द्यावी,  यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'विद्यार्थी पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत का ?' असा सवाल अधिवेशनात उपस्थित केला होता. या संस्थांच्या माध्यमातून प्रत्येकी दोनशे विद्यार्थ्यांनाच फेलोशिप दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. या फेलोशिपसाठीच राज्यभरातील विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षेत गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच सरसकट फेलोशिप द्यावी, अशीही मागणी विद्यार्थी करत आहेत.

प्रवीण गायकवाड या विद्यार्थ्याने सांगितले, छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात बार्टीच्या फेलोशिपसाठी मी परीक्षा दिली. मात्र, या परीक्षेत 2019 च्या सेट परीक्षेचे प्रश्न विचारले गेले. तसेच परीक्षा केंद्रात आणलेला प्रश्नपत्रिका संच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उघडला गेला नाही. परीक्षेत झालेला गोंधळ विचारात घेऊन राज्य शासनाने पीएचडी धारक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी.