विद्यार्थ्यांपर्यंत पूर्ण क्षमतेने शिक्षण पोहोचवा : कुलगुरू डॉ.गोसावी यांचे आवाहन

शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पूर्ण क्षमतेने शिक्षण पोहचवावे, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांपर्यंत पूर्ण क्षमतेने शिक्षण पोहोचवा : कुलगुरू डॉ.गोसावी यांचे आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवे शैक्षणिक धोरण (New Education Policy) हे विद्यार्थी केंद्रित व रोजगारक्षम आहे. यात विद्यार्थ्यांना ज्यात रुची आहे,असे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यामुळे विविध विद्याशाखा असणाऱ्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय निवडण्याची व शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पूर्ण क्षमतेने शिक्षण पोहचवावे, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी  (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) यांनी केले आहे.

सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयात (M.S. Kakade College) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्ष व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी प्रक्रिया या विषयावर जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी डॉ. गोसावी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे-देशमुख होते. यावेळी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू पराग काळकर, प्राचार्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देविदास वायदंडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रवींद्र शिंगणापूरकर, जोत्स्ना एकबोटे, डॉ. संगीता जगताप, अंतरविद्याशाखीय अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख डॉ. संजय ढोले, डॉ. मनोहर सानप, डॉ. प्रसन्न देशमुख, आनंदकुमार होळकर, डॉ. पंडित शेळके,  डॉ. भरत शिंदे, डॉ. संजय देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोसावी  म्हणाले, "चालू शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील सर्व महाविद्यालयात एनईपी (NEP) लागू करत आहोत. विद्यार्थ्यांना इंग्रजी सोबत मराठी भाषेतही परीक्षा देता येतील,  यासाठी दीडशे पुस्तके मराठीत आणली जाणार आहेत. यामध्ये राज्यात आपल्या विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. एनईपीनुसार, ६० टक्के मुख्य विषय विद्यार्थ्यांना बंधनकारक आहेत आणि ४० टक्के विषयात त्याला निवड स्वातंत्र्य असणार आहे. निवडीचे विषय ऑनलाइन किंवा ऑफलाईन याचेही विद्यार्थ्यांनाच स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आपल्याला चांगले विषय आणावे लागतील, उत्तम शिकवावे लागेल, प्राध्यापकांच्या वर्कलोड संदर्भातही अडचण येणार नाही कारण याबाबत सहसंचालक पातळीवर नियोजन सुरू आहे. 

प्र. कुलगुरू पराग काळकर म्हणाले, "आपल्या कार्यक्षेत्रात २६ खाजगी व ७१ स्वायत्त विद्यापीठे आहेत. त्यांच्या स्पर्धेत आपल्याला बदल स्वीकारावे लागणार आहेत. एनईपीस सामोरे जाताना विद्यापीठाने इंटर्नशिप पोर्टल सुरू केले असून ४०० आस्थापना जोडून घेतले आहेत. १० हजार विद्यार्थ्यांना याद्वारे नोकरीची संधी मिळू शकते. महाविद्यालयास जोडलेले अकरावी, बारावीचे वर्ग बंद करतील, अशी कुठलीही चर्चा अजून झालेली नाही" असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास वायदंडे यांनी केले. प्रा. अच्युत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. संजू जाधव यांनी आभार मानले.