एमएचटी-सीईटीच्या निकालातही तफावत; आदित्य ठाकरे यांची फेरतपासणीची मागणी

एमएचटी-सीईटीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना ‘आन्सर की' च्या आधारे मिळालेले गुण आणि पर्सेंटाइल यात मोठी तफावत असल्याचं विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे.

एमएचटी-सीईटीच्या निकालातही तफावत;  आदित्य ठाकरे यांची फेरतपासणीची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शैक्षणिक वर्तुळात आधीच नीट-यूजी (NEET-UG) च्या सदोष निकालामुळे गोंधळ पाहायला मिळाला होता. हा गोंधळ अजून थंड झाला नसताना आता एमएचटी-सीईटीच्या (MHT-CET) निकालाबाबतही  विद्यार्थी आणि पालकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. कारण एमएचटी-सीईटीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना ‘आन्सर की’(Answer key) च्या आधारे मिळालेले गुण आणि निकालातील पर्सेंटाइल यात मोठी तफावत असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांकडून केला जात आहे.त्यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून निकालात फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे.

निकाल लावण्यापूर्वी, रविवारी (दि.१६) सीईटी-सेलच्या (CET-CELL) वेबसाइटवर ‘आन्सर की’ जाहीर करण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांनी या ‘आन्सर की’चे स्क्रीन शॉट काढून ठेवले होते. ‘आन्सर की’नुसार जे गुण मिळायला हवे होते, ते गुण निकालातील पर्सेंटाइलशी जुळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

गेले दोन दिवस सीईटी-सेलच्या कार्यालयात निकालाबाबत तक्रार असलेले अनेक विद्यार्थी आणि पालक जात आहेत. यातील अनेकांनी याबाबत लेखी निवेदनही दिले आहे. याशिवाय त्यांनी  निकालात झालेली तफावत दूर करण्याची मागणी केली जात आहे.

फेरतपासणी करण्याची ठाकरे यांची मागणी

दरम्यान, आन्सर कि आणि मिळालेल्या पर्सेंटाइलमधील तफावतीबाबत विद्यार्थी-पालकांनी उद्धवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ठाकरे यांची भेट घेत यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. पालकांच्या तक्रारीवरून ठाकरे यांनी राज्याच्या सीईटी सेलला पत्र लिहून आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ई-मेल करून निकालाच्या फेरतपासणीची मागणी केली आहे.