Anti Corruption : पाच महिन्यांत शिक्षण विभागातील २१ जण सापळ्यात; आरोपींच्या नावांसह सविस्तर माहिती वाचा

राज्याच्या लाचलुचपत विभागाने एक जानेवारी ते ६ जून या कालावधीत केलेल्या कारवाईची माहिती घेतली असता शिक्षण विभागात १४ प्रकरणांमध्ये सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे.

Anti Corruption : पाच महिन्यांत शिक्षण विभागातील २१ जण सापळ्यात; आरोपींच्या नावांसह सविस्तर माहिती वाचा
Corruption in Education

राजानंद मोरे

राज्याचे शिक्षण आयुक्त (Education Commissioner) सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी शिक्षण विभागातील जवळपास ४० अधिकाऱ्यांची खुली चौकशी करण्याची विनंती राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) केली आहे. त्यानंतर शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा (Corruption in Education Department) मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मागील पाच महिन्यांत या विभागातील लाचलुचपतची १४ प्रकरणे समोर आली असून एसीबीच्या सापळ्यात २१ जण अडकले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकांचाही समावेश आहे.

मांढरे यांनी ज्या अधिकाऱ्यांची सचोटी व चारित्र्य संशयास्पद वाटत आहे अशा 40 अधिकाऱ्यांची खुली चौकशी करण्याबाबत संबंधित विभागीय पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पत्र दिले आहे. काही प्रकरणात ट्रॅप मध्ये सापडून सुद्धा त्यामध्ये काही पळवाटाद्वारे निर्दोष मुक्तता होऊन अधिकारी पुन्हा मूळ पदांवर रुजू होतात. या बाबीला आळा घालणे व या चुकीच्या वर्तनाबाबत योग्य शिक्षा व्हावी, या हेतूने हे पत्र देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पुणे एसीबीचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनीही याला दुजोरा दिला. सूरज मांढरे यांनी पत्र दिल्याचे सांगत तांबे त्यानुषंगाने चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले.

11th Admission : अकरावीची पहिली प्रवेश फेरी आजपासून; मुदतीत करा नोंदणी, अर्जाचा दुसरा भाग महत्वाचा

यापार्श्वभूमीवर राज्याच्या लाचलुचपत विभागाने एक जानेवारी ते ६ जून या कालावधीत केलेल्या कारवाईची माहिती घेतली असता शिक्षण विभागात १४ प्रकरणांमध्ये सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे. विभागाच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्या माहितीनुसार १४ प्रकरणांमध्ये २१ जणांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये वर्ग दोनचे पाच, वर्ग तीनचे ९ आणि वर्ग चारमधील एक कर्मचारी आहे. तर उर्वरित विभागाशी संबंधित इतर कर्मचारी आहेत. ही सर्व प्रकरणे तपासाधीन असल्याने एसीबीने म्हटले आहे.

एसीबीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार विभागनिहाय रचण्यात आलेला सापळा व त्यामध्ये पकडण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे (संबंधितांची पदे ही कारवाई करतेवेळी असलेली पदे आहेत. ही पदे एसीबीच्या माहितीमध्ये नमूद केलेली आहेत.)

 पुणे विभाग

१. प्रमिला प्रभाकराव गिरी, लेखाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, पुणे, अनिल श्रीधर लोंढे, ज्युनियर ऑडिटर, लेखाधिकारी कार्यालय, शिक्षण पुणे

- फिर्यादी हे शिक्षक असुन त्यांचे सेवापुस्तकावर सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चीतीची पडताळणी करून देणेसाठी आलोसे क्र. १ यांनी ६ हजार रुपये लाचेची मागणी करून आलोसे क्र. २ यांनी लाच मागणीस सहाय करून आलोसे क्र. १ यांचेवतीने लाच स्विकारली.

२. उज्वला सर्जेराव शेलार, मुख्याध्यापिका, प्राथमिक, आदर्श प्राथमिक विदयामंदीर, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा, बापू सर्जेराव सुर्यवंशी, उपशिक्षक प्राथमिक, आदर्श प्राथमिक विदयामंदीर

- आदर्श प्राथमिक विदयामंदीर, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा या शाळेच्या वार्षिक तपासणी दरम्यान तपासणी टिमने शाळेला चांगला शेरा दयावा व तपासणी टिमवर झालेल्या खर्चापोटी फिर्यादी यांच्या वाटयाची १ हजार ८७५ रुपये फिर्यादी यांचेकडे लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारली.

 

नांदेड विभाग

१. राजेंद्र नेपाळबुवा गिरी, पद - प्राचार्य, नेमणुक - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरूड, जि. लातूर

- फिर्यादी यांना त्यांचा चार महिन्यांचा पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणुन व त्यांची पेन्शनची फाईल नागपुर कार्यालयात मंजुरी करीता पासवर्ड देऊन लवकरात लवकर पाठविण्याकरीता फिर्यादी यांच्याकडे दारू व मटणाच्या पार्टीसाठी अडीच हजार रूपये लाचेची मागणी करून स्विकारली.

२. प्रल्हाद बळीराम खुडे, पद - जि. सह शिक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क ७ प्राथमिक शाळा, बळीरामपुर ता.जि. नांदेड, सध्या नेमणुक RTE (Right (To Education) २५% कागदपत्रे पडताळणी समिती, शिक्षण विभाग, पंचायत समिती नांदेड.

- फिर्यादी यांनी त्यांचा मुलगा वय ६ वर्षे याचे RTE (Right To Education) 25% अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केला असुन निवड यादीत फिर्यादी यांचे मुलाच्या अर्जाची निवड झाल्याने सदर समितीने फिर्यादी यांचे घरी | भेट देवुन पडताळणी केली असता फिर्यादी यांनी अर्ज करतेवेळीचे टाकलेले गुगलचे लोकेशन व पडताळणी करतांना पडताळणी समितीचे आलोसे सदस्य यांनी पाहीलेले लोकेशन यामध्ये तफावत असल्याचे सांगुन आलोसे यांनी सदर त्रुटीचे समायोजन करणेकरीता फिर्यादी यांचेकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २० हजार ००० रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झालेने गुन्हा दाखल.

३. भगवान नारायण लहाणे, मुख्याध्यापक, श्री शिवाजी विदयालय, पुर्णा सहकारी साखर कारखाना

- फिर्यादी यांचा मानधनाचा प्रस्ताव शालांत प्रणालीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी जिल्हा परिषद, हिंगोली येथे पाठविण्यासाठी आलोसे यांनी फिर्यादी यांचेकडे ६० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रूपये लाच स्विकारण्यास संमती दर्शवुन लाचेचा पहिला हप्ता म्हणुन स्विकारला.

ठाणे विभाग

१. जितेंद्र अशोक मोरे, शिपाई, शिक्षण व माध्यमिक विभाग जिल्हा परिषद ठाणे

- फिर्यादी यांच्या मैत्रिणीच्या मुलीच्या नावात शाळेतून चुकीने झालेला बदल दुरुती करणेकरिता आलोसे यांनी फिर्यादी यांचेकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दोन हजार रुपये स्विकारले.

औरंगाबाद विभाग

१. भारत रामभाउ भालेकर, केंद्रीय मुख्याध्यापक, जि. प. केंद्रीय प्राथमीक शाळा, तेरखेडा, ता. वाशी जि. उस्मानाबाद

- फिर्यादी यांचे जि.प. कन्याशाळा, कडकनाथवाडी ता. वाशी या शाळेसाठी शासनाकडून आलेल्या अनुदानाचा व मुख्याध्यापकाचे खात्यावर शासनाकडून जमा झालेल्या वेतनाचे विनात्रुटी लेखापरीक्षण करण्यासाठी शासकीय ऑडीटरला देण्याकरीता आलोसे यांनी फिर्यादी यांचेकडे ३०० रूपये लाचेची मागणी करून ३०० रूपये लाच रक्कम स्विकारली.

२. पांडुरंग दिगंबर भनगुरे, सचिव, अर्चना पांडुरंग भनगुरे, मुख्याध्यापिका, कांतीलाल बाबुलाल पांडे, शिपाई, सर्व चैतन्य शिक्षण संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा, चिकलठाणा, औरंगाबाद, विलास रामदासराव वाकोडे, कंत्राटी जिल्हा समन्वय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद

- फिर्यादी यांच्या मुलीस चैतन्य शिक्षण संस्था संचलीत श्री. रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळा येथे क्लार्क पदावर नोकरी लावुन देण्यासाठी आलोसे यांनी फिर्यादी याचेकडे १४ लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १३ लाख रुपये लाच रक्कम स्विकारली.

 

नाशिक विभाग

१. नंदलाल शंताराम शिनकर, मुख्याध्यापक, माध्यमिक विदयालय, सुळी ता. नवापुर, जि. नंदुरबार

- फिर्यादी यांनी सन २०१७-२०१८ यावर्षी माध्यमिक विदयालय सुळी, येथे इयत्ता दहावीचे शिक्षण घेतले असून त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांच्या आईचे नांव दुरुस्त करुन देणे व दहावीचे मार्कशीट नाशिक येथील बोर्ड कार्यालयातुन आणुन देण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी फिर्यादी यांचेकडुन दोन हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १ हजार ६०० रुपये लाचेची रक्कम स्विकारली.

२. विजय गुलाबराव पाटील, बहिस्थ परिक्षक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

- फिर्यादी यांची पत्नी व सोबत अन्य ७ विद्यार्थी हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र अंतर्गत प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे बिलीप (Bachelor of Library) ची अंतीम परिक्षा देत असताना आरोपी यांनी परिक्षेमध्ये फिर्यादी यांची पत्नी व त्यांचे सोबतचे ७ विद्यार्थ्यांना परिक्षेत त्रास न देता सहकार्य करण्याचे मोबदल्यात फिर्यादी यांचे कडे ७ हजार २०० रुपये लाचेची मागणी करुन ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली.

३. सुनिता सुभाष धनगर, प्रशासनाधिकारी / शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, नाशिक महानगरपालिका, नितीन अनिल जोशी, कनिष्ठ लिपीक, वनिता विकास मंडळ संचलित प्राथमिक विनय मंदीर नाशिक रोड,

- फिर्यादी हे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना संस्थेने सेवेतून बडतर्फ केलेले आहे. फिर्यादी यांना पुन्हा सेवेत सामावुन घेण्याचे पत्र संस्थेला देण्याचे मोबदल्यात आलोसे क्र. १ यांचेकडे गेले असता त्यांनी फिर्यादी यांचे कडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच सदर पत्र तयार करणेसाठी आलोसे क्र. २ यांनी फिर्यादी यांचे कडे ५ हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम आलोसे क्र. १ व २ यांनी स्विकारली.

 

नागपूर विभाग

१. धनपाल श्रीराम पटले, शिक्षक, प्रभारी केंद्रप्रमुख, जि.प. उच्च माध्यमिक शाळा ता. तिरोडा, जि. गोंदिया.

- फिर्यादी हे शिक्षक असुन त्यांची प्रकृती बरी नसल्याने माहे डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ मध्ये वैद्यकीय रजेवर होते. प्रकृती बरी झाल्यावर ते जानेवारी २०२३ मध्ये कर्तव्यावर हजर झाले. परंतु या वैद्यकीय रजा कालावधीतील त्यांचा पगार काढण्याकरीता त्यांनी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती तिरोडा यांच्याकडे कागदपत्रासह अर्ज केला होता. आलोसे यांनी फिर्यादीस गट शिक्षणाधिकारी यांचेकडुन त्यांची वैद्यकीय रजा मंजुर करून त्या कालावधीतील पगार काढुन देण्याकरीता १० हजार ०००  लाचेची मागणी करून तडजोडीअंती ९ हजार ००० रुपये स्विकारले.

२. भिमराव उध्दव अवथरे, अधिक्षक,  समग्र शिक्षा अभियान वसतिगृह, भामरागड, ता. भामरागड, जि. गडचिरोली

- फिर्यादी यांना दरमहा पगारात ३ हजार रुपये पगारवाढ केल्याचा मोबदला व कंत्राटी चौकीदार पदावर नियीमत ठेवण्याच्या कामाकरीता आलोसे यांनी फिर्यादी यांच्याकडे ५ हजार रुपये लाच रकमेची मागणी करून पाच हजार रूपये लाच रक्कम स्विकारली.

३. सुनिल मनोहर ढोले, वरिष्ठ लिपीक, कार्यालय शिक्षण, उपसंचालक, नागपूर विभाग, धंतोली, नागपूर, पवन ईश्वर झाडे, शिक्षक, खाशाबा प्राथमिक शाळा, जुना बगडगंज, नागपूर

- फिर्यादी यांना पब्लीक स्कुल, चंद्रपूर व शेरॉन पब्लीक स्कुल, घुग्गुस, जि. चंद्रपूर या दोन शाळांचा दर्जावाढ प्रस्तावाच्या शिफारशीवर उपसंचालक यांची सही घेवुन प्रस्ताव पुढे शिक्षण आयुक्त, पुणे यांचेकडे पाठविणेकरीता आलोसे क्र. १ व २ यांनी फिर्यादी यांचेकडे ५० हजार रूपये लाचेची मागणी करून स्विकारल्याने गुन्हा नोंद.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo