शिक्षकांना वेठबिगारीचे काम ; नवभारत साक्षरता सर्वेक्षण म्हणजे छळ 

सर्वेक्षण करताना शिक्षकाला ३ प्रपत्रात एका कुटुंबातीचे ९० स्तंभ  तर ८४ स्तंभ मुख्याध्यापकांना भरावयाचे आहे.मात्र, ही माहिती भरणे म्हणजे वेठबिगारीचा आहे.

शिक्षकांना वेठबिगारीचे काम ; नवभारत साक्षरता सर्वेक्षण म्हणजे छळ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
 नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (Nav Bharat Literacy Programme ) निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे काम शिक्षकांना देण्यात आले आहे.मात्र,यापूर्वीच्या अशैक्षणिक कामात आणखी एका अशैक्षणिक कामाची भर घालण्यात आली असून हे काम म्हणजे शिक्षकांचा छळच (Harassment of teachers) आहे. शैक्षणिक कामाच्या वेळा वगळून उर्वरित कालावधीत सर्वेक्षणाचे काम करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.मात्र,शिक्षकांना दिली जाणारी अशी अशैक्षणिक कामे (Non-academic works ) शैक्षणिक गुणवत्तेच्या ऱ्हासाचे कारण असून शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य (Mental health of teachers ) हिरावून घेणारे आहे. त्यामुळे शिक्षकांऐवजी खासगी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून निरक्षरांच्या सर्वेक्षणाचे काम करून घ्यावे, असे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्याच्या योजना विभागाचे संचालक महेश पालकर यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा: शिक्षण राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

नव भारत साक्षरता कार्यक्रम हा केंद्र पुरस्कृत असून राज्यातील निरक्षरांचे सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करणे हा त्या मागील मुळ उद्देश आहे. त्यात निरक्षरांचे नाव , लिंग, प्रवर्गनिहाय माहिती प्राप्त करून घेणे अपेक्षित आहे. १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या चौदा दिवसांच्या कालावधीत शिक्षकांनी हे सर्वेक्षण करावे, आशा सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र, सर्वेक्षण करताना शिक्षकाला ३ प्रपत्रात एका कुटुंबातीचे ९० स्तंभ  तर ८४ स्तंभ मुख्याध्यापकांना भरावयाचे आहे.मात्र, ही माहिती भरणे म्हणजे वेठबिगारीचा आहे. त्यात ट्रान्सजेंडर , बांधकाम मंजूर यांची माहिती जमा करणे म्हणजे मोठे दिव्यच आहे. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करून द्यावे,अशी अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देता येत नाहीत. तरीही वारंवार शिक्षकांवर आशा प्रकारची जबादारी सोपवली जात आहे. शिक्षकांना पायाभूत चाचणी, पहिली आकारीक मूल्यमापन, अध्यायन स्तर निश्चिती, निपुण भारत अंतर्गत काही जिल्ह्यातील वेगवेगळे उपक्रम यादी शैक्षणिक कामासह इतर ढीगभर अशैक्षणिक कामे आहेत. त्यात आता नव भारत साक्षरता कार्यक्रम म्हणजे शिक्षकांचा जीव घेण्याचाच प्रकार आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या नावाखाली शाळांमध्ये वेगवेगळके प्रयोग करणा-या स्वयंसेवी संस्थांकडून सर्वेक्षण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत,किंवा या सर्वेक्षणासाठी स्वतंत्र स्वयंसेवकांची नियुक्ती करावी.शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत,असेही निवेदनात नमूद केले आहे. 
----------------------

"निरक्षरांचे सर्वेक्षण ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे.कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे निरक्षर राहिलेल्या व्यक्तींना साक्षर करण्याचे केंद्र व राज्य शासनाने हाती घेतलेल्या कामात सर्वांनी सहभागी व्हायला हवे. त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून बांधकाम मंजूर व इतर कामगारांना सुशिक्षित करणे अधिक महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे" ,असे आवाहन राज्याच्या योजना विभागाचे संचालक महेश पालकर यांनी केले आहे.