SPPU NEWS : विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात पद भरती ; सहा महिन्यात रिक्त पदे भरण्याच्या सूचना

संलग्न सर्व महाविद्यालय व मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांनी संचालक, प्राचार्य व इतर शिक्षकीय पदे सहा महिन्यांच्या आत भरावीत, अशा सूचना विद्यापीठातर्फे संबंधित संस्थांना देण्यात आल्या आहेत.

SPPU NEWS : विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात पद भरती ; सहा महिन्यात रिक्त पदे भरण्याच्या सूचना

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी ) अंमलबजावणी (Implementation of National Education Policy) केली जाणार आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न सर्व महाविद्यालय व मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांनी संचालक, प्राचार्य व इतर शिक्षकीय पदे सहा महिन्यांच्या आत भरावीत, अशा सूचना विद्यापीठाने संबंधित संस्थांना दिल्या आहेत.

हेही वाचा: नापास विद्यार्थ्यांना विद्यापीठाची 'लॉटरी'; सर्वांनाच परीक्षेची एक संधी

महाराष्ट्रासह  देशभरातील विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयात एनईपी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी मेजर व मायनर असे विषय निवडले आहेत. आता उर्वरित महाविद्यालयांमध्ये एनईपीची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना आवश्यक तयारी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

विद्यापीठ अधिकार मंडळाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील सर्व पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम तसेच संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम हे नवीन शैक्षणिक धोरणानुसार सुरू करण्यात आले आहेत. तसेच विद्यापीठाशी संलग्न स्वायत्त महाविद्यालयांमध्ये 'एनईपी'ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. उर्वरित महाविद्यालयांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून एनईपीची अंमलबजावणी सुरू होईल.

स्वायत्त दर्जा प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम हे नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरू करण्यात येणार आहेत. तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात पदवी आणि स्वायत्त दर्जा प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयात व  पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम हे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून नवीन शैक्षणिक धोरणानुसार सुरू होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे तपासून नियमित स्वरूपात तात्काळ भरण्याची कार्यवाही करून पुढील सहा महिन्यात पूर्ण करावी. त्यामुळे एनईपी अंमलबजावणी कोणतीही अडचणी येणार नाही,आशा सूचना परिपत्रकाद्वारे विद्यापीठाने संलग्न संस्थांना दिल्या आहेत.  

---------------------

"नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांनी प्राध्यापक, प्राचार्य यांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. नियमानुसार सर्व कार्यवाही करून मान्यता प्राप्त प्राध्यापक व इतर रिक्त पदांचा अनुशेष भरून काढावा,असे आवाहन विद्यापीठातर्फे सर्वांना करण्यात आले आहे.त्यामुळे एनईपी अंमलबजावणी करणे सुखकर होईल."

- डॉ.पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ