विद्यार्थ्यांचे डोळे 'कमवा व शिका' योजनेच्या मंजुरीकडे; विद्यापीठाच्या मंजूरीला एक महिना विलंब

गेल्या दोन महिन्यात व्यवस्थापन परिषदेमध्ये प्र- कलुगुरू निवडीवरच चर्चा झाली. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची बैठक स्थगित करण्यात आली. परिणामी विद्यार्थी कल्याण विभागाच्या कमवा व शिका योजनेच्या प्रस्तावास मंजुरी मिळू शकली नाही.

विद्यार्थ्यांचे डोळे 'कमवा व शिका' योजनेच्या मंजुरीकडे; विद्यापीठाच्या मंजूरीला एक महिना विलंब

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न महाविद्यालयांमध्ये सप्टेंबर महिना उजाडला तरीही अद्याप कमवा व शिका योजना (Earn and Learn Scheme) सुरू होऊ शकली नाही. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून (University Management Council) योजना सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यामुळे आणि निधी खर्च करण्यास मंजुरी मिळाली नसल्याने हजारो विद्यार्थी (student) कमवा व शिका योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थी हिताच्या निर्णयांकडे केव्हा देणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : विद्यार्थ्यांनो, लागा तयारीला! विद्यापीठाच्या ‘युवक महोत्सवा’चे पडघम

आर्थिक दृष्ट्या दुर्बल , गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य व्हावे , स्वयं रोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे, विद्यार्थ्यांमध्ये श्रम संस्कृतीची जाणीव निर्माण व्हावी, विविध प्रकारची कामे करून मिळणाऱ्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने कमवा व शिका योजना राबविले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून कमवा व शिका योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यातच आता अर्धा सप्टेंबर महिना संपला तरीही कमवा व शिका योजनेस विद्यापीठाकडून मंजुरीच मिळाली नाही.

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात कमवा व शिका योजनेसाठी भरीव तरतूद केले जाते. तसेच हा अर्थसंकल्प विद्यापीठाच्या आधिसभेत व त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर केला जातो. परंतु,दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कमवा व शिकाय योजना सुरू करून त्यासाठीचा निधी खर्च करण्यास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घ्यावी लागते. गेल्या दोन महिन्यात व्यवस्थापन परिषदेमध्ये प्र- कलुगुरू निवडीवरच चर्चा झाली. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची बैठक स्थगित करण्यात आली. परिणामी विद्यार्थी कल्याण विभागाच्या कमवा व शिका योजनेच्या प्रस्तावास मंजुरी मिळू शकली नाही. त्यामुळे अद्याप विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये कमवा व शिका योजना सुरू होऊ शकली नाही, अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात केली जात आहे.

विद्यापीठाच्या लालफितीच्या कारभारात कमवा व शिका योजना अडकल्यामुळे हजारो विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून एक महिना मुकले आहेत. तसेच चालू शैक्षणिक वर्षांपासून योजनेच्या मानधनात वाढ होणार की जुन्याच मानधनानुसार योजना सुरू करणार याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे.
--------------------

"विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कमवा व शिका योजनेच्या मंजूरीस व निधी वितरणास मान्यता मिळावी यासाठीचा प्रस्ताव ठेवला आहे, या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर संलग्न महाविद्यालयात कमवा व शिका योजना तात्काळ सुरू होईल."

- अभिजीत कुलकर्णी, संचालक , विद्यार्थी कल्याण मंडळ , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

---------------------------------------------------------
"कमवा व शिका योजना ही गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महाविद्यालय सुरू होताच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. विद्यापीठाने विद्यार्थी हिताच्या योजनांमध्ये तत्परता दाखवणे गरजेचे आहे. येत्या आठवड्याभरात विद्यापीठाने याबाबत निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल." 

- संतोष ढोरे , माजी अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
----------------

"विद्यापीठाच्या मार्च महिन्यात झालेल्या आधिसभेच्या बैठकीत कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी वाढीव मानधनानुसार ही योजना सुरू करावी. त्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल." 

- दादाभाऊ शिनलकर, अधिसभा, सदस्य सावित्रीबाई फुले पुणे

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j