रॅप सॉंग प्रकरणी दोषींवर होणार कारवाई   

पुणे विद्यापीठाच्या परिसरात आणि मुख्य इमारतीच्या सभागृहात १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत रॅप सॉंगचे चित्रीकरण करण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. १ जानेवारी रोजी रविवारी असल्याने विद्यापीठाला सुट्टीच होती.

रॅप सॉंग प्रकरणी दोषींवर होणार कारवाई   

     एज्युवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे 

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात SPPU चित्रीत झालेल्या रॅप सॉंग  rap song प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर विद्यापीठातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत विद्यापीठातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे सुरक्षा विभागातील काही कर्मचारी निलंबित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे विद्यापीठाकडून सुरक्षा विभागावर Pune University security department तब्बल ७ कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र सुरक्षा विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून हे चित्रीकरण झाल्यामुळे अनेकांना आता घरी बसावे लागणार आहे.            

       पुणे विद्यापीठाच्या परिसरात आणि मुख्य इमारतीच्या सभागृहात १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत रॅप सॉंगचे चित्रीकरण करण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. १ जानेवारी रोजी रविवारी असल्याने विद्यापीठाला सुट्टीच होती. सुट्टीच्या दिवशी हे चित्रीकरण झाले असल्याचे बोलले जात आहे. परंतु, सुट्टीच्या दिवशीही विद्यापीठात कडेकोट बंदोबस्त ठेवणे आवश्यक होते. तो असता तर हा अनुचित प्रकार घडला नसता आणि चार महिन्यानंतर तो समोर आला नसता.                                 

            विद्यापीठात शूटिंग करण्यासाठी एका तासासाठी २५ हजार रुपये शुल्क आकारले जाते त्याचप्रमाणे पाच लाख रुपये अनामत रक्कम विद्यापीठाकडे जमा करावे लागते. रॅप सॉंग चित्रीकरण करणाऱ्या तरुणांनी विद्यापीठाकडे चित्रीकरणाच्या परवानगीसाठी अर्ज केला होता.अर्ज मिळाला, अशी पोहोच या तरुणांकडे  आहे . परंतु, त्यालाच काही जण परवानगीचे पत्र समजत आहेत. या पत्राच्या आधारे तर कोणी या तरुणांना चित्रीकरणासाठी परवानगी दिली नाही ना ? याची माहिती चौकशीतून समोर येईलच. परंतु, या सर्व घटनेने विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. त्यामुळे पुढील काळात असे प्रकार होऊ नये म्हणून विद्यापीठ प्रशासन कोणती पावले उचलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे,अशी चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात केली जात आहे.                                            

   -------------------------

विद्यापीठाने या घटनेसंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपासातून ज्या बाबी समोर येतील ; त्या अनुषंगाने विद्यापीठातर्फे आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.

- डॉ प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ