शाळेचा प्रताप :  विद्यार्थ्याला चौथीत केलं नापास, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरही उल्लेख

शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. पण खडकीतील एका खासगी शाळेचा प्रताप समोर आला आहे.

शाळेचा प्रताप :  विद्यार्थ्याला चौथीत केलं नापास, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरही उल्लेख
RTE Act

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. पण पुण्यातील खडकीतील (Khadki) एका खासगी शाळेचा (Private School) प्रताप समोर आला आहे. या शाळेने विद्यार्थ्याला चौथीत नापास केले असून शाळा सोडल्याच्या दाखल्यावरही (School Leaving Certificate) तसा उल्लेख केला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याला इतर कोणत्याही खासगी शाळेत प्रवेश मिळाला नाही. अखेर पालकांना आपल्या मुलाला नाईलाजास्तव महापालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न असलेली ही शाळा खडकीमधील नामांकित शाळा आहे. संबंधित विद्यार्थी पालकांसह खडकी राहण्यास असल्याने या शाळेत प्रवेश घेतला होता. पण काही कारणांमुळे वानवडी येथे राहण्यास जावे लागल्याने पालकांनी मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला शाळेकडे मागितला. चौथीच्या अंतिम परीक्षेत मुलाला चांगले गुण नसल्याचे कारण देत शाळेने शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यावर ‘Detained in STD 4th’ असा शेरा मारला.

शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी : ७६३ पदांसाठी मंगळवारपासून मुलाखती, पात्र उमेदवारांची यादी जाहीर

याविषयी ‘एज्युवार्ता’शी बोलताना मुलाच्या पालकांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, परीक्षेच्या काळात मुलगा आजारी असल्याने त्याला पेपर व्यवस्थितपणे देता आले नव्हते. त्यामुळे त्याला कमी गुण मिळाले होते. आम्ही वानवडी येथे राहण्यास गेल्याने मुलाला तिथल्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला घेतला. त्यावर शाळेने नापास असा शेरा मारला.

शाळा सोडल्याचा दाखला घेऊन आम्ही वानवडीतील खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी गेलो. मुलाला चौथीतच प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा होती. पण त्या शाळांनीही नियमांनुसार चौथी ऐवजी पाचवीत प्रवेश दिला जाईल, असे सांगितले. पण त्यासाठी दाखला बदलून आणण्यास सांगितले. पण शाळेकडून सुरूवातीला नकार देण्यात आल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे. तसेच सध्या मुलाला महापालिकेच्या शाळेत इयत्ता पाचवीतच प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा सुधारित दाखल्यासाठी शाळेत गेलो नाही, असेही पालकांनी स्पष्ट केले. दरम्यान, ही शाळा अनधिकृत असल्याचे पालकांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रात ५० हजार शिक्षकांची भरती : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

शिक्षण हक्क कायद्यानुसार, विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नाही. महाराष्ट्र शासनाने इयत्ता पाचवी व आठवीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कमी गुण मिळाल्यास संबंधित विद्यार्थ्याला त्याच वर्गात बसावे लागणार आहे. पण या निर्णयाची अंमलबजावणीही पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच २०२४-२५ पासून होणार आहे. पण खासगी शाळांकडून मात्र सर्रासपण आरटीईच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे सातत्याने आढळून येत आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD