SPPU NEWS: विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वसतिगृह अन् वाय-फायची सुविधा मिळेना

विद्यापीठातील विविध वस्तीगृहांमध्ये वाय-फाय संदर्भात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने तात्काळ वाय-फाय उपलब्ध करून द्यावे.तसेच गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश द्यावा, अन्यथा शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील.

SPPU NEWS: विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वसतिगृह अन् वाय-फायची सुविधा मिळेना

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना वाय-फायची (Wi-Fi) सुविधा अत्यावश्यक झाली आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) विविध वस्तीगृहांमध्ये वाय-फाय संदर्भात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने तात्काळ वाय-फाय उपलब्ध करून द्यावे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश द्यावा, अन्यथा शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील, असे निवेदन विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) यांना देण्यात आले. (Savitribai Phule Pune University)

विद्यापीठाची स्थापना ही विद्यार्थी हितासाठी झाली आहे. परंतु, अलीकडच्या काळात विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विचार केला जात असल्याचे दिसून येत नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या मुलांना केवळ वसतिगृह मिळत नाही, या कारणांमुळे गुणवत्तेच्या आधारे विद्यापीठातील विभागात मिळालेला  प्रवेश रद्द करून घरी जाण्याची वेळ आली आहे. विद्यापीठाने वसतिगृहाबाबत अशीच ताठर भूमिका घेतली तर पुढील काही कालावधीत विद्यापीठातील अनेक विभाग बंद पडतील. त्यात विद्यापीठात वाय-फाय सारख्या सुविधा नीटपणे चालत नाहीत. तसेच वसतिगृह कार्यालयाकडून विभागांना व वसतीगृहातील जागा देण्याबाबतच्या जाहीर केलेल्या कोट्यामध्ये अनेक चुका आहेत. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून द्यावे.

Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-३ लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवा; देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुचना

विद्यापीठातील वसतीगृहात अधिक विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. मात्र, पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना वसतीगृहाचा प्रवेश नाकारला जात आहे. परंतु, पुणे महानगरपालिकेकडून विद्यापीठातील सर्व वसतिगृहांना पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. त्याचप्रमाणे विद्यापीठाने स्वतः बोरवेल घेतल्या आहेत. पाणी कमी पडले तर या बोरवेलमधून विद्यार्थ्यांना पाणी उपलब्ध करून दिले जाऊ शकते. विद्यापीठातील विभागांमध्ये अभ्यासक्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु,वसतिगृहांची संख्या वाढत नाही. पुढील काही कालावधीत एक हजार मुले व एक हजार मुलींसाठी वसतिगृह उभे केले जाईल, अशी घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी केली आहे. परंतु, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठातील वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना वाय-फाय उपलब्ध होत नाही, या संदर्भातील अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केले आहेत. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून विद्यापीठाने वायफायची सुविधा निर्माण केली पण तिचा वापरच होत नसेल तर त्याचा उपयोग काय? त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने वायफायशी निगडित असणाऱ्या सर्व तक्रारींचे निराकरण करावे, या मागणीचे निवेदन विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे विद्यापीठाला देण्यात आले आहे.

दरम्यान, विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी याबाबत संवाद साधला असता वायफाय संदर्भात निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून सर्व वसतिगृहात वायफाय आता सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo