डॉ. कारभारी काळे ठरले सर्वाधिक एक वर्षाचा काळ मिळालेले पहिले प्रभारी कुलगुरू   

डॉ. नितीन करमळकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार देण्यात आला आहे.

डॉ. कारभारी काळे ठरले सर्वाधिक एक वर्षाचा काळ मिळालेले पहिले प्रभारी कुलगुरू   
SPPU VC Dr. Karbhari Kale

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) कुलगुरूपदी कोण विराजमान होणार याबाबत उत्सुकता असली तरी तब्बल एका वर्षापासून विद्यापीठाचे पूर्णवेळ कुलगुरू पद रिक्त आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे (Dr. Karbhari Kale) यांना शुक्रवारी (दि.१९) पदभार स्वीकारून बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे. प्रभारी कुलगुरू पदी एक वर्षाहून अधिक काळ काम करण्यास मिळणारे डॉ. काळे हे पहिले कुलगुरू (Vice Chancellor) ठरले आहेत. Dr. (Karbhari Kale became the first acting vice-chancellor with the longest tenure of one year)

विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो. कुलगुरू सेवानिवृत्त होण्यापूर्वी सुमारे सहा महिने अगोदर संबंधित पदाची निवडीची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असते पण पुणे विद्यापीठाच्या बाबतीत तसे होऊ शकले नाही. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार देण्यात आला.

हेही वाचा : अनुभवासह 'या' गोष्टी ठरवणार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू? आजपासून मुलाखतींना सुरूवात

डॉ. काळे यांनी कुलगुरू पदाचे सूत्रे स्वीकारून बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे. सध्या कुलगुरू पदाच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच विद्यापीठाला पूर्णवेळ करून मिळतील, अशी अपेक्षा आहे. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी काही महिन्यांपूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठरविला जाणार होता. परंतु, केरळ राज्यातील कुलगुरू निवड प्रक्रिया वादात सापडली.  

यूजीसीने निश्चित केलेल्या नियमावलीनुसार कुलगुरू निवड प्रक्रिया राबवावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे महाराष्ट्रात पुणे विद्यापीठांसह इतर सर्व विद्यापीठांची कुलगुरू निवड प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागली. त्यात बराच कालावधी गेला. त्यामुळे डॉ. कारभारी काळे यांना तब्बल एक वर्ष प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार मिळाला. तसेच नवीन कुलगुरूंची निवड होईपर्यंत तो त्यांच्याकडे राहणार आहे.

हेही वाचा : पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी खास 'ॲप', थेट ऑनलाईन संवाद साधता येणार

पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर जयकर यांच्यापासून डॉ. नितीन करमळकर यांच्यापर्यंत विद्यापीठाला २० पूर्ण वेळ कुलगुरू मिळाले. दरम्यानच्या काळात केवळ ७ प्रभारी कुलगुरू नियुक्त करण्यात आले. त्यातील एकाही प्रभारी कुलगुरूंना एक वर्षाचा कालावधी मिळाला नाही.

विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू

डॉ. राम ताकवले : १६/११/८८ ते १८/४/८९

डॉ. बा. द. चौरे : २५/३/९८ ते ११/४/९८

डॉ. नि. ज. सोनवणे : १९/९/२००० ते २५/२/२००१

डॉ. रत्नाकर गायकवाड : २६/२/२००६ ते २३/८/२००६

डॉ. अरुण अडसूळ : १५/६/२००९ ते १५/३/२०१०

डॉ. संजय चहांदे : १६/९/२०११ ते १५/५/२०१२

डॉ. देवानंद शिंदे : १६/५/२०१७ ते १८/५/२०१७

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2