11th admission :कला शाखेच्या अनुदानित तुकड्या  पडणार बंद ? कनिष्ठ शिक्षक संघटनेची शिक्षण मंत्र्यांकडे धाव 

कला शाखेत केवळ २५ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिणामी कला शाखेतील शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे.

11th admission :कला शाखेच्या अनुदानित तुकड्या  पडणार बंद ? कनिष्ठ शिक्षक संघटनेची शिक्षण मंत्र्यांकडे धाव 
11th admission update

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी (11 th -fyjc ) कला शाखेत प्रवेश (Junior College arts faculty admission) घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रमुख महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील कला शाखेत केवळ २५ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिणामी कला शाखेतील शिक्षकांच्या (Junior College arts faculty teacher) नोकरीवर गदा येणार आहे. त्यामुळे शासनाने अनुदानित तुकडीतील विद्यार्थी संख्येचे निकष बदलावेत, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडून केले जात आहे.

हेही वाचा :शिक्षण धक्कादायक : शिक्षणाधिकाऱ्याची बनावट सही करून शाळेने मिळवली बोर्डाची मान्यता

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पुणे ,मुंबई ,नागपूर, नाशिक व अमरावती या महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. कला शाखेच्या तुलनेत वाणिज्य व विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट ते चौपट असल्याचे दिसून येत आहे. कला शाखेच्या तुलनेत विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा ओढा वाणिज्य व विज्ञान शाखेकडे जास्त आहे.

कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एका तुकडीत ६० विद्यार्थी असणे अपेक्षित आहे.परंतु, ग्रामीण व शहरी भागातही अनेक कनिष्ठ महाविद्यालयात एका तुकडीत एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे शिक्षक संघटनेकडून सांगितले जात आहे. परिणामी विद्यार्थी संख्या अभावी अनुदानित तुकड्या बंद होणार आहेत. त्यामुळे शासनाने अनुदानित तुकडी टिकवण्यासाठी शहरी भागात ३० विद्यार्थी व ग्रामीण, आदिवासी भागात २० विद्यार्थी संख्या ग्राह्य धरावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली आहे.

वेगळी बातमी : शिक्षण 11th Admission : तीन फेऱ्यांनंतरही ६० टक्के जागा रिक्त, मुंबई-पुणे आघाडीवर

राज्यात काही ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने तर काही महानगरपालिका कार्यक्षेत्रात ऑनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पुणे- पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात ४ हजार ५२८ विद्यार्थ्यांनी ,मुंबई महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयात १५ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी, नागपूरमध्ये २, हजार २८ विद्यार्थ्यांनी, नाशिकमध्ये २ हजार ७१ तर अमरावतीत १ हजार ३९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या आकडेवारीवरून अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक अतिरिक्त होणार असल्याचे स्पष्ट होतात.


     कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस संतोष फाजगे म्हणाले , राज्यातील अनुदानित तुकड्या टिकवण्यासाठी शासनाने वेळोवेळी आपल्या धोरणात बदल केले आहेत. अनुदानित तुकड्यांमध्ये विशेषतः गरीब, मागासवर्गीय व ग्रामीण ,आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात. अनुदानित तुकड्या बंद पडल्यास या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाने अनुदानित तुकड्या बंद न करता त्या टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत. या मागणीचे निवेदन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे.

राज्यातील पाच महानगरपालिका कार्यक्षेत्रात कला शाखेत झालेल्या प्रवेशाची आकडेवारी 

शहर    प्रवेश क्षमता   झालेले प्रवेश
मुंबई     ४९,९५०           १५,६६६
पुणे      १७,५०००           ४,५२८
नागपूर   ८,२००             २,२०८
नाशिक   ५,२७०           २,०७१
अमरावती ३,६३०          १,३३३
-------------