धक्कादायक : शिक्षणाधिकाऱ्याची बनावट सही करून शाळेने मिळवली बोर्डाची मान्यता

'अकॅडमीक हाइट्स पब्लिक स्कूल' या शाळेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांची बनावट सही केल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक : शिक्षणाधिकाऱ्याची बनावट सही करून शाळेने मिळवली बोर्डाची मान्यता
Forging the signature of the Education Officer

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राहुल शिंदे 

शालेय शिक्षण विभागाकडून (School Education Department) अनधिकृत शाळांवर (Bogus Schools) कारवाई सुरू असताना शिक्षण अधिकाऱ्याची बनावट सही (Forging Signature) वापरून पुण्याजवळील चिखलीतील शाळेने सीबीएसई बोर्डाकडून (CBSE) 'एक्सटेन्शन ऑफ ॲफिलेशन' मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने चौकशी सुरू असून संबंधित शाळेवर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, यानिमित्ताने शाळांना बनावट प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीचे काय झाले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथील 'अकॅडमिक हाइट्स पब्लिक स्कूल' (Academis Heights Public School) या शाळेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांची बनावट सही वापरून सीबीएसई बोर्डाकडून 'एक्सटेन्शन ऑफ ॲफिलेशन' मिळवले आहे. मुस्ताक शेख हे १२ ऑगस्ट २०१३ ते १८ जुलै २०१७ या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली मुंबई उत्तर येथे शिक्षण निरीक्षक या पदावर झाली होती. २०१७ ते २०२१ या कालावधी मुंबई येथे कार्यरत होते. सध्या शेख हे सिंधुदुर्ग येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. शेख हे इतर जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांच्या सहीचे बनावट प्रमाणपत्र या शाळेने अपलोड केल्याचे आढळून आले.

शाळेचा प्रताप : विद्यार्थ्याला चौथीत केलं नापास, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरही उल्लेख

सीबीएससी बोर्डाच्या नियमावलीनुसार संबंधित शाळेने आवश्यक कागदपत्र संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यानुसार चिखली येथील अकॅडमीक हाइट्स पब्लिक स्कूल या शाळेने विविध कागदपत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. त्यात आवश्यक कागदपत्रांमधील नमुना- दोन वर शेख यांच्यासारखी सही दिसत असल्याचे निदर्शनास आले. तसेच हा नमुना ७ मे २०१९ रोजीचा असून यावेळी शेख हे मुंबई येथे कार्यरत होते. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी व सचिव मुकेश तिलवाणी यांनी संबंधित कागदपत्र अपलोड केल्याचा उल्लेख दिसून आला. त्यामुळे मुस्ताक शेख यांनी पुणे जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात लेखी तक्रार दिली. त्यानुसार चौकशी केली असता शेख यांची बनावट सही वापरण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेख यांच्याकडून चौकशीसाठी पत्र

मी पुणे जिल्हा परिषदेत कार्यरत नसताना माझ्या बनावट स्वाक्षरीचे पत्र वापरून चिखली येथील अकॅडमी हाइट्स पब्लिक स्कूल या शाळेने सीबीएसई बोर्डाकडून एक्सटेन्शन ऑफ ॲफिलेशन मिळवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या संदर्भात चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यासंदर्भातील पत्र पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून चौकशी केली जात आहे.

- डॉ. मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

शाळेकडूनही कबुली

शिक्षण अधिकारी डॉ. मुस्ताक शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाळेची चौकशी करण्यात आली आहे.त्यात शाळेने बनावट सहीचे प्रमाणपत्र वापरण्याचे आढळून आले. शाळेने सुद्धा हे मान्य केले आहे.आता शिक्षण विभागाकडून पुढील कारवाई केली जात आहे.

- रमेश चव्हाण, उप शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD