जिल्हाधिकाऱ्यांची विद्यापीठाला तंबी; समान संधी केंद्र नसलेल्या महाविद्यालयांची संलग्नता रद्द करा!

समाज कल्याण आयुक्तालयाने दीड वर्षांपुर्वी सर्व महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह इतर सर्व विद्यार्थ्यांच्या अडचणींचे महाविद्यालय स्तरावर निकारण करण्यासाठी समान संधी स्थापन करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

जिल्हाधिकाऱ्यांची विद्यापीठाला तंबी; समान संधी केंद्र नसलेल्या महाविद्यालयांची संलग्नता रद्द करा!
SPPU

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण (Higher Education), संशोधनातील संधी, करिअर मार्गदर्शन यांसह त्यांच्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी सर्व महाविद्यालये तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये समान संधी केंद्र (Equal Opportunity Centers) स्थापन करण्याचे आदेश दीड वर्षांपुर्वी देण्यात आले होते. पण जवळपास १ हजार २०० शाळा-महाविद्यालयांनी (Colleges) त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच पत्र पाठवून कारवाईची तंबी दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (SPPU) संलग्न महाविद्यालयांमध्ये अशी केंद्र स्थापन न केल्यास संलग्नता रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

समाज कल्याण आयुक्तालयाने दीड वर्षांपुर्वी सर्व महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह इतर सर्व विद्यार्थ्यांच्या अडचणींचे महाविद्यालय स्तरावर निकारण करण्यासाठी समान संधी स्थापन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पण पुणे जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांसह शाळांमध्येही अशी केंद्र स्थापन करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.

नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाई केली का? देवळाणकरांची विद्यापीठांना विचारणा

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याची दखल घेत विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांना पत्र पाठवून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तसेच समान संधी स्थापन केलेल्या महाविद्यालयांची यादीही त्यासोबत जोडली आहे. समान संधी केंद्र स्थापन न केल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या निष्काळजीपणामुळे लाभ वेळेवर मिळत नाही. ही बाब भूषणावह नाही, अशी नाराजी देशमुख यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

संबंधित महाविद्यालयांमध्ये केंद्र स्थापन करण्याचे आदेश द्यावेत. जी महाविद्यालये अशी केंद्र स्थापन करणार नाहीत, त्या महाविद्यालयांची विद्यापीठाशी संलग्नता रद्द करावी, असे आदेशही देशमुख यांनी दिले आहे. त्यानुसार कुलसचिवांनी सर्व संलग्न महाविद्यालयांना केंद्र स्थापन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

समान संधी केंद्राची कामे

  • उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन करणे
  • उच्च शिक्षणाच्या संधी व उच्च शिक्षणासंदर्भातील क्षेत्रे
  • उद्योजकीय क्षेत्रे, त्याबाबतच्या संधी
  • संशोधन विषयक संधी व शिक्षणाचे क्षेत्र
  • सुधारात्मक प्रशिक्षण व योजना
  • महिला अभ्यास केंद्र संस्था व महाविद्यालय
  • लोकसंख्या शिक्षण विभाग
  • आर्टिफिशयल इंटेलिजन्स
  • करिअर कट्टा, नोकरी मार्गदर्शन
  • स्पर्धा परीक्षा
  • देश विदेशातील संधी
  • कौशल्य विकास कार्यक्रम व योजना
  • सोशल मीडियाचा वापर
  • शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo