SPPU NEWS:  कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून बेमुदत आंदोलन, विद्यापीठाचा निकाल लांबण्याची शक्यता

विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे तसेच पालखी सोहळ्यामुळे काही विषयांची परीक्षा उशिरा घ्यावी लागल्यामुळे अद्याप निकाल जाहीर होऊ शकले नाहीत.

SPPU NEWS:  कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून बेमुदत आंदोलन, विद्यापीठाचा निकाल लांबण्याची शक्यता
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांचे निकाल (Results) लवकरात लवकर लागाव्यात या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) परीक्षा विभागातर्फे (Examination Department) युद्ध पातळीवर काम सुरू आहे.मात्र, विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून (दि.१८ जुलै) बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठाचे निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Savitribai Phule Pune University News)

राज्यातील बहुतांश विद्यापीठांचे निकाल जाहीर झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे तसेच पालखी सोहळ्यामुळे काही विषयांची परीक्षा उशिरा घ्यावी लागल्यामुळे अद्याप निकाल जाहीर होऊ शकले नाहीत. विद्यापीठाची संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी सर्व उत्तरपत्रिका लवकर तपासून विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचे गुण जमा करावेत, यासाठी प्राध्यापकांकडे पाठपुरावा केला जात आहे.

विद्यापीठाला निकालाची घाई; वेळेत केला बदल अन् प्राध्यापक झाले सैरभैर

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे निकाल जाहीर होणे गरजेचे आहे. विद्यापीठांचे निकाल रखडल्यामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यात कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक संयुक्त समितीने ३ जुलै रोजी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी विविध मागण्यांबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यातील प्रमुख मागण्यांवर कोणताही निर्णय झाला नाही.

पदोन्नतीच्या मागणीसाठी १० ते १५ दिवसात उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यासह संयुक्त कृती समितीची बैठक आयोजित केली जाईल, अशी मागणी मान्य करण्यात आली होती. परंतु, विद्यापीठाने बैठक आयोजित केली नाही. त्यामुळे विद्यापीठाने कर्मचा-यांची दिशाभूल केली आहे. तसेच उर्वरित मागण्या मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवणे अपेक्षित होते. मात्र, त्या संदर्भातही सकारात्मक हालचाली झाल्या नाहीत, त्यामुळे आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील धिवार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब आंत्रे, कामगार संघटनेचे अध्यक्ष रघुवीर व्हावळ यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या संदर्भातील निवेदन कुलगुरू कार्यालयाला देण्यात आले आहे.

अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठीतून करण्याला प्राधान्य : चंद्रकांत पाटील

विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी  आंदोलनावर गेल्यास परीक्षा विभागातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे निकाल उशिरा लागल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन रोखण्यात विद्यापीठ प्रशासनाला यश येते का?  याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD