नोकर भरती मध्ये पण खोके पॅटर्न? तलाठी परीक्षेची उत्तरपत्रिका दहा लाखांत...

एमआयडीसी सिडको पोलिसांनी राजू भीमराव नागरे याला मंगळवारी सायंकाळी साडे चार वाजता अटक केली आहे. मोबाईलमधील टेलिग्रामवर तलाठी भरती परीक्षेच्या ३४ प्रश्नांचे फोटो आढळून आले.

नोकर भरती मध्ये पण खोके पॅटर्न? तलाठी परीक्षेची उत्तरपत्रिका दहा लाखांत...
Talathi Bharti

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यभरात सध्या गाजत असलेल्या तलाठी भरती (Talathi Recruitment) परीक्षेतील पेपरफुटीच्या घटना थांबता थांबत नाहीत. घोटाळेबाजांचे रॅकेट सक्रीय असून नुकतेच चिकलठाण्यातील ईऑन जडिटिल परीक्षा केंद्राबाहेरून एकाला अटक करण्यात आली आहे. दहा लाख रुपयांत परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका पुरविण्याचा दावा ही टोळी करायची. या प्रकारानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नोकर भरती मध्ये पण खोके पॅटर्न, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?, अशी टीका केली आहे.

 

एमआयडीसी सिडको पोलिसांनी राजू भीमराव नागरे याला मंगळवारी सायंकाळी साडे चार वाजता अटक केली आहे. परीक्षा केंद्राबाहेर चार जण संशयास्पदरीत्या थांबलेले आढळल्यानंतर पोलिसांनी त्यांना हटकले. त्यातील तिघे पळून गेले तर नागरे पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे मास्टर कार्ड, दोन मोबाईल सापडले. मोबाईलमधील टेलिग्रामवर तलाठी भरती परीक्षेच्या ३४ प्रश्नांचे फोटो आढळून आले.

पुण्यात पुन्हा कोयत्याची दहशत; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला

परीक्षा सुरू झाल्यानंतर केवळ १६ व्या मिनिटाला राजूच्या मोबाईलमध्ये प्रश्न आले होते. राजूने सकाळच्या सत्रातील परीक्षेदरम्यान एका परीक्षार्थीला उत्तरे पुरविल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. दुपारच्या सत्रातही उत्तर पुरविण्याच्या तयारीत तो होता. राजूही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता. फौजदारपदाची लेखी परीक्षा उत्तीर्णही झाला. पण मैदानी चाचणीआधी दंगलीचा गुन्हा दाखल झाल्याने तो भरती प्रक्रियेतून बाहेर पडला.

 

दरम्यान, वडेट्टीवार यांनी याप्रकारानंतर राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, नोकर भरती मध्ये पण खोके पॅटर्न, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? बेरोजगारीने होरपळत असलेले तरुण जीव तोडून नोकर भरतीची तयारी करतात. पण त्यांच्या स्वप्नांना लाखो रुपये घेऊन विकण्याच काम सरकार करतंय. १० लाखांत तलाठी पद विकले जात आहे. वनरक्षक भरती नंतर आता तलाठी परीक्षेत देखील गैरप्रकार समोर येत आहेत. युवकांचे भविष्य असे आम्ही विकू देणार नाही. पदभरती मधील गैरप्रकारांचे उत्तर सरकारने द्यावे, दोषींवर कठोर कारवाई व्हावी. याचा कर्ता करविता कोण आहे?, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पुन्हा तलाठी परीक्षा प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली आहे. तलाठी परीक्षेचे थेट परीक्षा केंद्रच मॅनेज झाले असण्याची शक्यता आहे. पेपर फोडून बाहेर पाठविण्यात येतो आहे. प्रश्न केंद्राबाहेर पाठवून चिठ्ठीच्या मदतीने उत्तरे पुरविण्याचा नवा धंदा आहे. दहा लाखांत या टोळ्या तलाठी पदासाठी काम करून देतात. TCS च्या नावावरही बट्टा लागला आहे. तलाठी भरतीत मोठा घोटाळा सुरू असून सरकारने या परीक्षा तत्काळ स्थगित करून पुन्हा घ्याव्या. झालेल्या परिक्षांवर आमचा विश्वास नाही, असे समितीने ट्विटमध्ये म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j