..तर या कॉलेजच्या प्राध्यापकांची पदे देणार दुसऱ्या कॉलेजला 

प्राध्यापक भरतीला मान्यता दिलेली असतानाही अनेक महाविद्यालयाकडून याबाबतचे प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नाहीत.

..तर या कॉलेजच्या प्राध्यापकांची पदे देणार दुसऱ्या कॉलेजला 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या उच्च शिक्षण विभागांतर्गत (Higher Education Department) येणाऱ्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये (Granted College) प्राध्यापक भरतीला (professor recruitment )मान्यता दिलेली असतानाही अनेक महाविद्यालयाकडून याबाबतचे प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी येत्या १५ जूनपर्यंत ऑनलाइन प्रस्ताव सादर न केल्यास संबंधित महाविद्यालयांची पदे अन्य महाविद्यालयांना वर्ग केली जातील, असे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर (Higher Education Director dr Shailendra Deolankar) यांनी स्पष्ट केले आहे.
    राज्य शासनातर्फे २०१७ च्या विद्यार्थी संख्येनुसार अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच उच्च शिक्षण संचालनालयाने वेळोवेळी मुदतवाढ देऊन ना हरकत प्रमाणपत्र मागणी प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले आहे. परंतु,शासनाने पदे भरण्यास परवानगी दिलेली असतानाही पद भरतीस मंजूर असलेली पदे भरण्याबाबत काही महाविद्यालयांनी अजूनही ना हरकत प्रमाणपत्राकरिता मागणी प्रस्ताव सादर केले नसल्याचे समोर आले आहे. 
    पदभरतीसाठी मंजुरी न दिलेल्या अनेक अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील रिक्त पद संख्येत विविध कारणांमुळे वाढ झाली आहे. स्वायत्तता प्राप्त झालेल्या महाविद्यालयाकडून तसेच नॅक अ + व अ दर्जा प्राप्त महाविद्यालयांची पदभरतीसाठी मागणी प्राप्त होत आहे. त्यामुळे पदभरती मंजुरी असूनही महाविद्यालयाकडून या संदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात नसेल तर संबंधित महाविद्यालये पदभरतीसाठी इच्छुक नसल्याचे ग्राह्य धरले जाईल. तसेच संबंधित महाविद्यालयाची मंजूर पदे अन्य महाविद्यालयांना किंवा संस्थांना वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर केला जाईल, असेही डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी स्पष्ट केले आहे.