सायबर स्पेस आणि आपली मुले; आभासी जगातून वास्तव जगाकडे चला... 

कोवळ्या वयातील आपल्या मुला मुलींच्या मनावर इंटरनेट चा पाश हळूहळू आवळत आहे. ऑफलाइन शाळा सुरू झाल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवत आहे.

सायबर स्पेस आणि आपली मुले; आभासी जगातून वास्तव जगाकडे चला... 
World Mental Health Day

जागतिक मानसिक आरोग्य दिनविशेष... 

World Mental Health Day : आपण जेव्हा आपला संगणक (Computer) किंवा स्मार्टफोन (SmartPhone) उघडतो. तेव्हा अलीबाबाच्या गुहेतील खजिना समोर असतो. आपल्याला हवी असलेली माहिती आणि संकल्पना एक कळ दाबता आपल्या समोर हजर होते. आपली मुले-मुली सुद्धा या कल्पवृक्षाची फळे चाखत आहेत. पण कल्पवृक्षाखाली उभे राहून काय मागावे. हा विवेक मोठ्याकडेच नाही तेथे लहानांना कुठून येणार…

 

आपण आपल्या मुलांना इंटरनेट (Internet), सायबर कॅफेच्या (Cyber Cafe) गुहेपासून खरेच लांब ठेवू शकतो का? मूल जन्मले की त्याचे व्हिडिओ शूट होते. लांब राहणाऱ्या आत्या, मावश्या, आजी-आजोबा, स्काईपवर, व्हाट्सअप वर बाळाला जोजवतात. आई youtube वर चंद्र दाखवून घास भरवते. (अनेक लहान मुले मोबाईल पाहिल्याशिवाय  जेवत नाहीत.) बाळाचे व्हिडिओ फेसबुक वर टाकतात. इन्स्टा वर कौतुक होते. बाल वयातील मुले विचारतात - 'माझ्या फोटोला किती लाईक आले..!'

 

कोविड काळामध्ये तर हिच स्क्रीन मुलांचा वर्गातील फळा बनला होता. कुमारवयातील मुला-मुलींना स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी टेक्स्ट, पोस्ट, ट्विट हे मार्ग छान वाटतात. आपण आपले आर्थिक व्यवहार, खरेदी-विक्री इंटरनेट वापरून करायला शिकलो आहोत. आपल्या सर्व आयुष्याला याने  वेढले आहे.

 

दुष्परिणाम :

कोवळ्या वयातील आपल्या मुला मुलींच्या मनावर इंटरनेट चा पाश हळूहळू आवळत आहे. ऑफलाइन शाळा सुरू झाल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवत आहे.

- बालवाडीतील, शिशुवर्गातील मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव

- अनावश्यक हालचाल

- लिहिण्या-वाचण्याचा कंटाळा व उशीर

- क्षुल्लक चुका करणे यांचे प्रमाण वाढले आहे

- प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये 

- अभ्यासातील रस कमी होणे

- बोअरिंग वाटणे

- एकत्र खेळणे

- नियम पाळणे 

- संवाद साधणे

 

या आघाड्यावर समस्या दिसून येत आहे. तर कुमारवयात (वय दहा ते अठरा मधील)  मुलांमध्ये खालील समस्या जाणवत आहेत.

- शाब्दिक व शारीरिक हिंसा वृत्ती वाढणे.

- टोमणे मारणे.

- शरीराच्या ठेवणीबद्दल एकमेकाला चिडवणे.

- व्हिडिओ गेम्स, पॉर्नोग्राफीचे आकर्षण.

- सोशल मीडिया सेलिब्रिटी यांचे अंधानुकरण..

   

मुले -मुली सेक्सटॉर्शन, ब्लॅकमेल, डिजिटल फ्रॉड, न्यूज प्रोपोगोंडा यांचे बळी ठरत आहेत.  हा ताण असह्य होऊन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण नियमितपणे वाचतो, ऐकतो आहोत. वृद्ध व्यक्तींची सुद्धा आर्थिक फसवणूक होत असते. दिव्यातून बाहेर आलेला हा राक्षस आहे. याला मालक कोण आणि सेवक कोण हे समजून घेऊन दिव्यामध्ये परत पाठवू या. यासाठी प्रत्येकाने काही प्रोटोकॉल पाळणे गरजेचे आहे.

 

काय काळजी घ्यायची?

- मुले पाच ते सहा वर्षाची होईपर्यंत फक्त संभाषण आणि शैक्षणिक संवाद या दोनच कामासाठी आणि तेही मोठ्या व्यक्तीच्या निरिक्षणाखाली स्क्रीन देण्यात यावा.

- मुले जो कंटेंट पाहतात याची खात्री पालकांनी करावी.

-  गेम्सचे सर्टिफिकेट जरूर तपासावे.

- पालक नियंत्रण, प्रायव्हसी सेटिंग यांचा वापर करावा.

- पासवर्ड सेटिंग, स्क्रीन लॉक याचा वापर करून मुलांना सुरक्षित करावे.

 

पालकांनी स्वतःचा व मुलांचा स्क्रीन टाईम कमी करून शाब्दिक खेळ, चित्रकला, क्राफ्ट यामध्ये मुलांसोबत वेळ घालवावा. मुलांना इतर मुलाबरोबर मिसळू द्यावे. भाजी आणणे, निवडणे, स्वयंपाकाची तयारी यात मुलांना सामील करून गुंतवून ठेवावे. 

शाळकरी मुले मित्रांशी ऑनलाईन बोलतात, खेळतात तेव्हा खोलीच्या दरवाजाला आतून बंद करता येणार नाही असा नियम करावा. सायबर सुरक्षा याचे महत्त्व मुलांना समजावून सांगावे. अनोळखी लोकांशी ऑनलाइन चॅट करताना सावध असावे. आपले फोटो, गोपीनीय माहिती कुणालाही देऊ नये.

- फसव्या जाहिराती, आफवा याने प्रभावित होता कामा नये.

- कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी खात्री करणे अवश्यक आहे.

- मुलांकडे स्वतःचा स्मार्टफोन, लॅपटॉप असेल तर त्याला पासवर्ड लॉक नसावे.

- पालकांना फोन, लॅपटॉप  पाहण्यासाठी खुला असावा.

-  मुलांची स्क्रीन सर्च हिस्ट्री मधून - मधून पालकांनी पहावी.

- सोशल मीडिया ॲपवर टायमर लावून जास्तीत - जास्त दोन तास स्क्रीन टाईम मुलांना प्रत्येक दिवशी उपलब्ध असावा.

 हे सर्व नियम संदर्भासाठी आहेत. घराघरातील परिस्थिती व मुलाचे ऐकून घेऊन बालक व पालक या दोघांनीही ते पाळावेत. किशोरवयीन मुलांचा सायबर गुन्हे, पोर्नोग्राफी, बाल लैंगिक अत्याचार, आत्महत्या या विषयावर पालकांबरोबर मोकळा संवाद होणे आवश्यक आहे.

 इंटरनेस उपवास : 

पालकांनी स्वतः "इंटरनेट उपवास" आठवड्यातून एकदा केला तर मुले उदाहरणातून शिकतील. आपली मुले सोशल मीडियावर किती वेळ असतात कुणाशी संपर्क ठेवतात. कोणते गेम खेळतात. कॅमेरा सुरू असतो का? या मुद्द्यावर विचार करणे अपेक्षित आहे.

 

सायबर व्यसन :

 मूल अंघोळ, अभ्यास, व्यायाम, मोकळ्या हवेतील खेळ, झोप, नैसर्गिक विधी यांच्याकडे दुर्लक्ष करून संगणकासमोर तासन् - तास बसत आहेत. परीक्षेतील गुण, संवाद कमी झाला आहे.. तर त्याला / तिला 'सायबरचे व्यसन' झाले असे म्हणू शकते. ताबडतोब मानसोपचारतज्ञ किंवा समुपदेशक यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

 

गुण कमी झाले, शाळेतील अनुपस्थिती किंवा शिक्षकांच्या तक्रारी आल्या. तर व्यसनाधीनता, उदासिनता, चिडचिड, निद्रानाश, आत्महत्येची शक्यता या लक्षणेसाठी व्यवस्थित तपासून औषध योजना केली पाहिजे.   एकटेपणा, आत्मविश्वासाचा अभाव, कंटाळा, आळस, समाजात वावरण्यातील न्यूनगंड या समस्यांसाठी समुपदेशकाची मदत घ्यावी.

 

 मुलांना इंटरनेटच्या आभासी विश्वातून तुमच्या आमच्या वास्तव जगात आणण्यासाठी त्यांना असे मित्र मिळवायला प्रोत्साहन द्या ज्यांना ते 'प्रत्यक्ष' भेटू शकतील.

- एकत्रित खेळ, नाटक, डान्स करू शकतील.

- बागेत, हॉटेलमध्ये चहाच्या टपरीवर चर्चा, विनोद, मस्करी करू शकतील.

- आयुष्याला अर्थ निर्माण करण्यासाठी आपले छंद, खेळ, नव नवीन कामामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणे.  हे उपक्रम पालकांनी हाती घ्यावेत. व हळूहळू मुलांना त्याच सामील करून घ्यावे. 

- स्व - मदत गट, आधार गट, याची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता.

    

पालकांची सुजाण आणि सजग साथ मिळाली तर मुलांची नकारात्मक स्वप्रतिमा, न्युनगंड या सर्व समस्यावर मात करता येईल. चला...! बालक आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करून ही अद्भुत रम्य  सायबर स्पेस सफर सुरू करू या...!!

 

 - डॉ. शमा राठोड (लेखिका येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात वरिष्ठ मनोविकारतज्ञ आहेत)

 (शब्दांकन : मोहन बनसोडे,समाजसेवा अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा)