‘इस्रो’ची नोकरी नको रे बाबा; उच्चशिक्षित तरुणांची पाठ, काय आहे नेमकं कारण?

कमी पैसे खर्चून सर्वोत्तम काम ही इस्रोची ओळख आहे. पण याचमुळे आयआयटीचे विद्यार्थी इस्रोमध्ये काम करण्यास तयार होत नाहीत.

‘इस्रो’ची नोकरी नको रे बाबा; उच्चशिक्षित तरुणांची पाठ, काय आहे नेमकं कारण?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

चांद्रयान, मंगलयान यांसह अनेक यशस्वी मोहिमांमुळे भारतीय अंतराश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) सामान्य नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (IIT) विद्यार्थी मात्र  इस्रोमध्ये काम करण्यास तयार नाहीत. देशातील आयआयटी संस्थांमधून प्लेसमेंट्च्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची निवड होते, पण फक्त १ टक्का विद्यार्थीच नोकरी करण्यास तयार होतात, अशी माहिती खुद्द इस्रो प्रमुख डॉ. एस. सोमनाथ (Dr. S. Somnath) यांनी दिली. 

 

अतिशय कमी संसाधनांमध्ये इस्रोचे शास्त्रज्ञ काम करतात. आधीच्या मोहिमांमध्ये वापरलेलं साहित्य, सुटे भाग यांचा पुनर्वापर करुन शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ कमी खर्चात पुढील मोहिमा राबवत असतात. कमी पैसे खर्चून सर्वोत्तम काम ही इस्रोची ओळख आहे. पण याचमुळे आयआयटीचे विद्यार्थी इस्रोमध्ये काम करण्यास तयार होत नाहीत. देशातील सर्वोत्तम इंजिनीयर आयआयटीमधून बाहेर पडतात. पण त्यांना इस्रोमध्ये काम करण्यात रस नाही, असे सोमनाथ यांनी सांगितले.

अहमदनगर : वादग्रस्त प्राध्यापक भरतीवर सोमवारी कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा

 

आमची टीम इंजिनीयर्सच्या भरतीसाठी आयआयटीमध्ये गेली होती. त्यांनी करिअरमधील संधींबद्दल विद्यार्थ्यांना सांगितलं. इस्रोमधील संधी, तिथल्या कामाची पद्धत सांगितली. तुम्हाला इस्रोत इतका पगार मिळेल, असं म्हणत आकडेवारी दिली. इस्रोत आपल्याला कमाल किती पगार मिळू शकतो याचा आकडा पाहिल्यावर तिथले ६० टक्के विद्यार्थी उठून निघून गेले, असा किस्सा सोमनाथ यांनी सांगितला.

 

दरम्यान, उद्योगपती हर्ष गोयंका यांनी काही दिवसांपूर्वीच एक ट्विट केले  होते. "इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांचा पगार २.५ लाख रुपये आहे. आयआयटी पास विद्यार्थ्यांना टॉप प्लेसमेंट मिळाल्यानंतरचा पगार अडीच लाखांच्या आसपास जातो. तर इस्रोमध्ये सुरुवातीला मिळणारा ५६ हजारांच्या घरात आहे," असे ट्विट  गोयंका यांनी केले होते. काही चांद्रयान मोहिमेनंतर इस्त्रोमधील कर्मचाऱ्यांचा पगार थकल्याची माहितीही समोर आली होती.