तुमच्या मुलांना 'गुड टच -बॅड टच' विषयी सांगितलंय का? मग या गोष्टी माहिती हव्यातच...

लहान मुलांवर होणाऱ्या लैगिक अत्याचाराची सुरुवात वाईट हेतूने केल्या जाणाऱ्या स्पर्शाने होते. जर हाच स्पर्श लहान मुलांना समजला किंवा आपण त्याबद्दल त्यांना शिकवण दिली तर अशा घटना रोखता येऊ शकतात.

तुमच्या मुलांना 'गुड टच -बॅड टच' विषयी सांगितलंय का? मग या गोष्टी माहिती हव्यातच...
Good Touch Bad Touch

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

काही दिवसातच नवीन शैक्षणिक वर्ष (Education Year) सुरु होणार आहे. अनेक छोटी पावले पहिल्यांदाच शाळेत (School) पडणार आहेत. तो किंवा ती पहिल्यांदाच काही तास घरापासून आणि आपल्यापासून दूर राहणार आहे, या विचाराने काही पालक (Parents) अधिकच काळजीत असतील. प्राथमिक (Primary) किंवा माध्यमिक (Scondary) शाळांमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींचीही पालकांना चिंता असते. अशा परिस्थितीत लहान मुलांवरील वाढत्या अत्याचाराच्या आणि  लैंगिक शोषणाच्या (Sexual Harassment) वाढत्या घटना यामुळे पालकांमध्ये तणावाचे प्रमाण अधिकच वाढते. अशावेळी  पालक आणि शाळांनी  मुलांच्या सुरक्षेसाठी काही खास पाऊले उचलायची गरज आहे.

लहान मुलांवर होणाऱ्या लैगिक अत्याचाराची सुरुवात वाईट हेतूने केल्या जाणाऱ्या स्पर्शाने होते. जर हाच स्पर्श लहान मुलांना समजला किंवा आपण त्याबद्दल त्यांना शिकवण दिली तर अशा घटना रोखता येऊ शकतात. या चिमुकल्यांना 'गुड टच-बॅड टच' विषयी कसे सांगावे, याबद्दल 'फौंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन, मुस्कान प्रोजेक्ट' च्या सह संचालिका शुभदा रणदिवे (Shubhada Randive) यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना पालकांना महत्वाचे मार्गदर्शन केले आहे. या प्रक्रियेत पालकांचीच जबाबदारी मोठी आहे.

हेही वाचा : द्विलक्षी अभ्यासक्रम : दहावीनंतरच करिअरला दिशा देणारे व्यवसाय शिक्षण

रणदिवे म्हणाल्या, "वाईट स्पर्श काय हे मुलांना समजवण्याआधी तुम्ही त्यांना चांगला स्पर्श काय हे सुद्धा समजावले पाहिजे. जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला स्पर्श करतो आणि तेव्हा तुम्हाला त्यातून प्रेमाची भावना कळते किंवा खूप चांगले वाटते किंवा त्या स्पर्शाने सुरक्षित वाटते. तर अशा स्पर्शाला चांगला स्पर्श म्हणतात. ही गोष्ट तुम्ही मुलांना समजावून सांगितली पाहिजे आणि वेळ पडली तर ते स्पर्श त्यांना करून दाखवा. कसे की प्रेमाने मिठी मारणे, मायेने किस करणे. त्यांना सांगा की जर एखाद्या व्यक्तीने हात पकडला आणि तुम्हाला चांगलं वाटलं तर तो व्यक्ती चांगला आहे असं समजावं. मात्र एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शाने त्रास होत असेल तर मात्र त्या व्यक्तीपासून दूर राहावे."

"ज्या स्पर्शामुळे त्रास होतो किंवा आपल्याला यात काहीतरी चुकीचे होते आहे असे वाटते तो स्पर्श वाईट आहे, असे मुलांना समजावून सांगा. मुलांना तुम्ही असे काही स्पर्श नीट समजावून सांगू शकता. आपल्या प्रायव्हेट बॉडी पार्टसना केल्या जाणाऱ्या स्पर्शाबद्दल त्यांना प्रामुख्याने सांगा. काही विशिष्ट अवयव असतात ज्यांना चांगला स्पर्श करणारा व्यक्ती कधीच टच करणार नाही. अशा अवयवांबाबत मुलांना विशेष माहिती द्या," असे रणदिवे यांनी नमूद केले.

"मुलांना काही गोष्टी स्पष्टपणे सांगा की आई, वडील किंवा घरातील खूप जवळचे व्यक्ती तुम्हाला अंघोळ घालत असताना शरीराला स्पर्श करू शकतात. किंवा डॉक्टर ते सुद्धा पालकांच्या उपस्थित मुलांच्या खाजगी अवयवांना स्पर्श करू शकतात. यांच्याव्यतिरिक्त कुणी जर मुलांना स्पर्श केला आणि तो स्पर्श मुलांना नकोसा वाटला तर मुलांनी त्यांना सरळ नाही म्हणावे आणि तरीही समोरचा व्यक्ती ऐकत नसेल तर तिथून सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करावा. इतरांकडून मदत मागावी, आपल्या घरी पालकांना ही बाब सांगावी, " असेही रणदिवे म्हणाल्या.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2