मुलांकडून अवाजवी अपेक्षा कराल तर होईल पश्चाताप!

पालकांना आणि मुलांना अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही किंवा चांगले गुण मिळणार नाही या भीतीने बरीच मुले डिप्रेशनमध्ये जातात किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.

मुलांकडून अवाजवी अपेक्षा कराल तर होईल पश्चाताप!
Student stress Reprasentative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दोन दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) या राज्यात तब्ब्ल १० विद्यार्थ्यांनी (Students) १० वी  व १२ वी च्या निकालाच्या (SSC Result) भीतीने आत्महत्या केल्याची भयानक घटना घडली. सध्या सगळीकडे परीक्षांच्या (Examination) निकालांचे दिवस आहेत. पालकांना (Parents) आणि मुलांना अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही किंवा चांगले गुण मिळणार नाही या भीतीने बरीच मुले डिप्रेशनमध्ये जातात किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. ही परिस्थिती टाळता येऊ शकते. वर्षभर केलेले अभ्यासाचे नियोजन, परीक्षेची तयारी, आणि पालकांचा योग्य तो पाठिंबा यामुळे अशी परिस्थिती टाळता येऊ शकते. 

या संदर्भात  'एज्युवार्ता' शी बोलताना बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके (Dr. Ulhas Luktuke) म्हणाले, "मुळात अशी परिस्थिती उद्भवणारच नाही याकडे लक्ष देण्याची पालक आणि मुलांची दोघांची जबाबदारी आहे. वर्षभर वेळेचे आणि अभ्यासाचे योग्य नियोजन, मुलांचा कल ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि मदत या गोष्टींमुळे बऱ्याच नको त्या गोष्टी टाळता येऊ शकतात."

हेही वाचा : ॲम्बी व्हॅलीत शिक्षण विभागाची कार्यशाळा की इव्हेंट मॅनेजमेंट शो?

डॉ. लुकतुके म्हणाले, "विद्यार्थी वर्षभर जो अभ्यास करतात, जे परीक्षेत लिहितात तेच परीक्षेनंतर निकालाच्या स्वरूपात मुलांच्या हाती पडते. निकाल आल्यानंतर त्यावर पश्चताप करत बसण्यापेक्षा किंवा अपयशाच्या भीतीने दुःख करत बसण्यापेक्षा पुढच्या वर्षीची तयारी कशी करता येईल याकडे मुलांनी आणि पालकांनी लक्ष द्यावे. पालकांनीही निकाल आल्यनंतर मुलांवर ओरडणे, त्यांना हीन वागणूक देऊ नये, त्यामुळे त्यांचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यापेक्षा आपला पाल्य अभ्यासात कुठे कमी पडला, परीक्षेत काय चूक झाली, त्याला कसे कमी मार्क पडले यावर पाल्य आणि शिक्षक दोघांशी चर्चा करावी. त्याला पुन्हा परीक्षा देण्यास सांगावे, आधी झालेल्या चुका दुरुस्त करून त्याला पुन्हा नव्याने परीक्षा देण्यास तयार करावे."

पालकांनी आधी आपल्या मुलांचा कल आणि कुवत ओळखावी त्याच्याकडून अवाजवी अपेक्षा करू नये. आपल्या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्या विषयात अधिक रस आहे, तो कोणत्या कलेत पारंगत होऊ शकतो या गोष्टी पाहून त्याला त्या कलेत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असा सल्लाही यावेळी डॉ. लुकतुके यांनी दिला.