राज्यातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहांची सुरक्षा आता महिलांच्या हाती

राज्यातील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारती आणि जागेसंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

राज्यातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहांची सुरक्षा आता महिलांच्या हाती
Government Girls Hostel Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात (Girls Hostel) महिला सुरक्षा रक्षक (Security Guard) नियुक्त करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मंगळवारी विधानसभेत (Maharashtra Assembly) केली. तसेच सुरक्षेबाबत विविध उपाययोजना करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयी -सुविधा पुरविण्याबाबत विधानसभा सदस्य आकाश फुंडकर, बळवंत वानखडे, राम कदम, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तसेच राज्यातील इतर वसतिगृहांतील दुरावस्थेबाबतही काही सदस्यांनी चर्चेदरम्यान चिंता व्यक्त केली.

तीन हजार पोलिसांची कंत्राटी पध्दतीने होणार भरती; सरकारने काढला जीआर

सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले, खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयीसुविधा पुरविण्यात येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनुसार यास जबाबदार असलेल्या गृहपालाच्या पदाचा कार्यभार काढण्यात आला असून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

राज्यातील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारती आणि जागेसंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षा आणि सोयीसुविधासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD