प्राध्यापकांची रिक्त पदे भरा; आता युजीसी अध्यक्षांनीच लिहिले राज्यांना पत्र

युजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी स्वतः अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, शिक्षण सचिव आणि राज्यपालांच्या सचिवांना प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत पत्र लिहिले आहे.

प्राध्यापकांची रिक्त पदे भरा; आता युजीसी अध्यक्षांनीच लिहिले राज्यांना पत्र

देशातील विविध राज्यांमधील विद्यापीठांमध्ये व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये अजूनही प्राध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती करण्यासाठी सर्व राज्यांना यूजीसीने पत्र लिहिले आहे. युजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी स्वतः अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, शिक्षण सचिव आणि राज्यपालांच्या सचिवांना प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत पत्र लिहिले आहे.

 प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे शिक्षण क्षेत्रावर परिणाम होतो. त्यामुळे योग्यरित्या पात्र आणि सक्षम उमेदवारांची निवड करून प्राध्यापकांची रिक्त पदे वेळेवर भरणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरात लवकर योग्य पावले उचलणे गरजेचे आहे,असे जगदीश कुमार यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले. 

    प्राध्यापक हे शैक्षणिक प्रक्रियेचे आधारस्तंभ आहे.शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, विशिष्ट कार्यक्रम विकसित करणे, अध्यापन-अध्ययन आणि मूल्यमापन प्रक्रियांची प्रभावी अंमलबजावणी करणे, विद्यार्थ्यांना समाजाचे जबाबदार सदस्य म्हणून विकसित करणे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे.त्यासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रेरणादायी, उत्साही आणि सक्षम प्राध्यापकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे,असे जगदीश कुमार यांनी सर्व राज्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.तसेच त्यात राज्य विद्यापीठे आणि त्यांच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये रिक्त प्राध्यापक पदे वेळेवर भरण्याची खात्री करावी. देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षित आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

-------------

 प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती करणे गरजेचे आहे. सीएचबी प्राध्यापकांवर कामाचा ताण येत आहे.अपु-या प्राध्यापकांच्या संख्येमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.त्यामुळे युजीसीने पत्र पाठविल्यावर तरी राज्य शासनाने जागे होऊन रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करावी. 

- डॉ.संदिप पाथ्रिकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटना