तीन हजार पोलिसांची कंत्राटी पध्दतीने होणार भरती; सरकारने काढला जीआर 

मुंबई पोलीस आयुक्तालयाने या भरतीबाबत राज्य शासनाकडून परवानगी मागितली होती. शासनाकडून सोमवारी याबाबतचा जीआर काढून भरतीला मान्यता दिली आहे.

तीन हजार पोलिसांची कंत्राटी पध्दतीने होणार भरती; सरकारने काढला जीआर 
Mumbai Police Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य शासनाच्या (Maharashtra Government) विविध विभागांमध्ये कंत्राटी पध्दतीने विविध पदांसाठी पदभरती केली जाते. पण गृह विभागाअंतर्गत पोलीस कर्मचारी व इतर संबंधित पदांसाठी अशी भरती (Police Recruitment) होत नाही. मात्र, राज्य सरकारने मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात तब्बल तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी कंत्राटी पध्दतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर काही आमदारांनी आक्षेप घेत पावसाळी अधिवेशनातही (Maharashtra Assembly) हा मुद्दा उपस्थित करून या भरतीला विरोध केला.

मुंबई पोलीस आयुक्तालयाने या भरतीबाबत राज्य शासनाकडून परवानगी मागितली होती. शासनाकडून सोमवारी याबाबतचा जीआर काढून भरतीला मान्यता दिली आहे. या जीआरमध्ये ही भरती केवळ ११ महिन्यांसाठी कंत्राटी पध्दतीने होणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून हे कर्मचारी घेतले जाणार आहेत.

Twitter War : स्पर्धा परीक्षा आंदोलकांच्या ट्विटर वॉरमध्ये जितेंद्र आव्हाडांची उडी

जीआरमध्ये म्हटले आहे की, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची ४० हजार ६२३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे १० हजार पदे रिक्त असून, मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळ सर्व प्रकारच्या दैनंदिन कर्तव्यांकरिता अपुरे पडत आहे.

शासन निर्णय दि. २१ जानेवारी २०२१ अन्वये बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी ७ हजार ७६ पोलीस शिपाई संवर्गातील व पोलीस चालक संवर्गातील ९९४ पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू असलेली ७ हजार ७६ पदे वगळल्यानंतरही आयुक्तालयात सुमारे ३ हजार पदे रिक्त राहत आहेत. तसेच सदर अंमलदार हे भरती प्रक्रिया व प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी २ वर्षांनंतर आयुक्तालयास उपलब्ध होणार आहेत.

सीमाभागातील विद्यार्थ्यांवर अन्याय; भरतीत मिळेना स्थान, आपल्याच निर्णयाचा सरकारला विसर

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलिस शिपाई पदे विहीत मार्गाने भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत किमान ११ महिने कालावधीसाठी एकूण ३ हजार मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्याची विनंती पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी शासनाकडे केली आहे. या विनंतीस अनुसरुन बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याची कार्यवाही पुर्ण होईपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD