संपूर्ण कारकिर्दीत नियतीने मला मार्गदर्शन केले : डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे प्रतिपादन
डॉ. शां. ब. मुजुमदार यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल ‘रोटरी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.या प्रसंगी माझा नशिबावर विश्वास आहे आणि माझ्या संपूर्ण कारकिर्दीत नियतीने मला मार्गदर्शन केले आहे, असे मत मुजुमदार यांनी व्यक्त केले.

एजयवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे
जगभरातील लोकांच्या त्वचेचा रंग वेगळा, चालीरीती आणि परंपरा वेगळ्या, पेहरावाची पद्धत वेगळी , परंतु आपल्या सर्वांच्या रक्ताचा रंग मात्र एकच आहे, चेहऱ्यावचे हास्य एकसारखेच आहे, आपल्या आकांक्षा एक सारख्याच आहेत "वसुधैव कुटुंबकम" ही संकल्पना हे सत्य आहे. आपण एकमेकांपासून वेगळे आहोत पण एक आहोत,असे मत सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार (Symbiosis founder president SB Mujumdar) यांनी व्यक्त केले.तसेच माझा नशिबावर विश्वास आहे आणि माझ्या संपूर्ण कारकिर्दीत नियतीने मला मार्गदर्शन केले आहे,असेही मुजुमदार म्हणाले.
रोटरी इंटरनॅशनल तर्फे डॉ. शां. ब. मुजुमदार यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल ‘रोटरी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. मुजमदार बोलत होते. याप्रसंगी रोटरी इंटरनॅशनलचे संचालक डॉ महेश कोटबागी , रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 गव्हर्नर डॉ. अनिल परमार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका व प्र – कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते , सिंबायोसिस विद्यापीठाच्या वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर, रोटरीचे माजी जिल्हा गव्हर्नर डॉ. माधव बोराटे,संतोष. मराठे, अमिता कोटबागी आदी उपस्थित होते.
मुजुमदार म्हणाले, मला माझ्या आयुष्यात जे यश मिळाले ते माझे एकट्याचे नसून सिंबायोसिस मधील आम्हा सर्वांचे आहे. हे सर्व मी एकट्याने केले असे मी कधीच म्हणणार नाही. हे आम्ही सर्वानी केले असेच मी म्हणेन. परमेश्वराच्या कृपेमुळे हे शक्य झाले आणि त्यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे.
आपण लोकांना वसुधैव कुटुंबकम” ही संकल्पना शिकवल्यास व लोकांमध्ये ती रुजवल्यास एक दिवस असा येईल; जेव्हा जगातील युद्ध, संघर्ष संपले असतील. "वसुधैव कुटुंबकम" हा सिंबायोसिस डीएनए आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपण हे साध्य करू शकतो. विद्यापीठे ही संकल्पना प्रत्यक्षात आणू शकतात,असेही मुजुमदार म्हणाले.