पुणे विद्यापीठासह मुंबई, कोकण विद्यापीठालाही मिळाले नवे कुलगुरू; कोण आहेत नवे कुलगुरू?

मागील काही दिवसांपासून तीनही विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुक्तीवरून तर्कवितर्क लढविले जात होते. मुलाखतींना दहा दिवस उलटून गेले तरी नावांची घोषणा होत नव्हती.

पुणे विद्यापीठासह मुंबई, कोकण विद्यापीठालाही मिळाले नवे कुलगुरू; कोण आहेत नवे कुलगुरू?
Dr Ravindra Kulkarni, Dr. Suresh Gosavi, Dr. Sanjay Bhave

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबरच (SPPU) मुंबई विद्यापीठ (Mumbai University) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठालाही (Kokan Agriculture University) नवे कुलगुरू मिळाले आहे. राज्यपाल कार्यालयाकडून मंगळवारी या तीन नावांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) तर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी (Dr. Ravindra Kulkarni) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. संजय भावे (Dr. Sanjay Bhave) यांची कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरु म्हणून वर्णी लागली आहे.

मागील काही दिवसांपासून तीनही विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुक्तीवरून तर्कवितर्क लढविले जात होते. मुलाखतींना दहा दिवस उलटून गेले तरी नावांची घोषणा होत नव्हती. त्यामुळे नवे कुलगुरू कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यावरून विद्यापीठ वर्तुळात विविध नावे समोर येत होती. प्रत्येकाच्या वरचढ बाजूंवर चर्चा झडत होत्या. अखेर राज्यपाल कार्यालयाने मंगळवारी नावांची घोषणा केली.

मोठी बातमी : डॉ. सुरेश गोसावी यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती

डॉ. रवींद्र कुलकर्णी हे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पद रिक्त झाले होते. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर अतिरिक्त कार्यभार डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे हे अतिरिक्त कारभार संभाळत होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo